Nandurbar News नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी, सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता. दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क मतदान घेण्याचा निर्णय घेताला आहे. आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहा दिसून आला आहे. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते, की उभी हे पाहणे आता मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी ठरणार आहे.
दारूबंदीसाठी महिलांचे मतदान, मतदानासाठी महिलांच्या रांगा
गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1,260 महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली आहे. गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे. तर आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने आमची मागणी मंजूर केली असली तरी जास्तीत जास्त महिलांनी मतदानासाठी यावे, असे आवाहन महिलांनी केले आहे.
गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. अखेर महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणारे, हे मतदानाच्या वेळेस समजणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेची एकच कौतुक केलं जात आहे.
देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या, महिलांचा रुद्रावतार
असेच काहीसे आंदोलन संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बाभुळगाव गंगा इथे बघायला मिळाले आहे. यात महिलांनी देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या. बाबळगाव गंगा शिवारात सुरू असलेल्या दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून महिलांनी हॉटेल वर जात लपवून ठेवलेला दारूचा साठा शोधला, हॉटेल लगत असलेल्या शेतातील पिकात हा दारू साठा लपवून ठेवला होता .संतप्त महिलांनी हा दारूचा साठा ताब्यात घेत दारूच्या बाटल्या रस्त्यावरच फोडल्या. पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने महिलांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला
हे ही वाचा