Dhule News : धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून ग्रामोद्योग अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय चाटी (Vijay Chati) हे धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारीपदी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय चाटी हे मद्य प्राशन करून आपल्या कार्यालयात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते विजय चाटी यांच्या कार्यालयात जाऊन धडकले.
विजय चाटी पोलिसांच्या ताब्यात
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता या ठिकाणी विजय चाटी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण भाजपाचे आणि आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचे अजब उत्तर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विजय चाटी यांना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या