Nandurbar News : घरात अठरा विश्व दारिद्रय, परिस्थिती चारही बाजूंनी प्रतिकूलच! मात्र, खचून न जाता आणि परिस्थितीचा बाऊ न करता धैर्याने आणि जिद्दीने आता शिक्षण घ्यायचे आणि वडिलांच्या छायेत ध्येय गाठायचे असा निर्धार केलाय आठ वर्षाच्या दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या गणेशने. हात नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा गणेश पायाने अक्षरे गिरवत असून इतर मुलांसारखेच तो शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी असलेली त्याची धडपड आणि जिद्द पाहून अनेकजण अचंबित होत आहेत. नंदुरबारच्या (Nandurbar) शहादा तालुक्यातील असलोद या छोट्याशा गावातील गणेशची ही संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


असलोद इथल्या आठ वर्षांच्या दिव्यांग गणेश अनिल माळी (Ganesh Mali) या चिमुकल्याच्या आयुष्यात दैवाने संघर्ष उभा थाटला आहे. गणेशच्या जगण्यासाठीचा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष पाहून आपल्या डोळ्यातही अश्रू आले नाहीच तर नवलच. अत्यंत निरागस आणि पाहिल्यासोबत मोहित करणारा आठ वर्षांचा गणेश माळी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. जन्मापासूनच त्याचे दोन्ही हात नाहीत. तरी त्याची शिक्षणासाठीची इच्छा, जिद्द कमी झालेली नाही. त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी वडीलच सांभाळत आहेत.


शिक्षणासोबत खेळाचीही आवड


गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवत आहे. पायानेच तो मोबाईल फोनदेखील सहजरित्या हाताळतो. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील त्याची चपळता भल्याभल्यांना अवाक् करणारी आहे. वडील मोलमजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजराण करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहतो. गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे.


पायानेच घेतो घास


हात नसल्याने जेवण सुद्धा पायाने चमचाच्या सहाय्याने करतो. त्याच्या या संघर्षाची अनुभूती त्याच्या प्रत्येक क्रियेप्रसंगी येते. वर्गातील अन्य मित्रही त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतातच. गणेश पायाने लिखाण आणि इतर क्रिया सहज करत असला तरी काही गोष्टींसाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. यातून बराच वेळा शेजारी काही ग्रामस्थ मदत करतात. या कोवळ्या वयातही त्याचे शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचे दिव्यांगत्व अडवू शकलेले नाही.


कृत्रिम हातांसाठी ग्रामस्थांचा सामाजिक संस्थांसह राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा


असलोद ग्रामस्थांनी राज्यातील सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांकडे गणेशाच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे. यामुळे त्याला लवकरच कृत्रिम हात मिळतील अशी आशा आहे. सरकारने पुढे येऊन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करुन दिल्यास आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास गणेश आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायी लढाच ठरेल, यात शंका नाही!


हेही वाचा


Nandurbar News: नंदुरबारच्या युसूफभाईंनी रस्त्यावर पडलेला 100 किलो नायलॉन मांजा केला गोळा; 15 वर्षांपासून निभावतात सामाजिक दायित्व