Sugarcane Crushing: यावर्षीचा म्हणजेच 2022-23 च्या हंगामासाठी 15 ऑक्टोबरनंतरच गाळप सुरू करण्याचे निर्देश साखर आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार राज्यभरात ऊस गाळप सुरु झाले. दरम्यान औरंगाबाद विभागातील (Aurangabad Division) तब्बल 25 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केलेला असून, आतापर्यंत 55 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर यातून तब्बल 49 लाख क्विंटल साखरेची निर्मिती (Sugar Production) झाली आहे. ज्यात सर्वाधिक 19 लाख 93 हजार 809 मेट्रिक टन उसाचे गाळप बीड जिल्ह्यात (Beed District) झाले आहे.
गाळप क्षमता वाढविण्यात आली.
औरंगाबाद विभागातील अनेक कारखान्यांचे बॉयलर नोव्हेंबर अखेरीस पेटले. गेल्यावर्षी निर्माण झालेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने शेतकऱ्यांसह शासन व प्रशासनालाही त्रास सहन करावा लागला होता. मे अखेरपर्यंत गाळप सुरू ठेवावे लागले होते. असे असताना यंदा 2022-023 च्या हंगामासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन सुमारे 25 टक्क्यांनी वाढलेले आहे. त्यामुळे मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यंदा साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे.
अशी आहे आकडेवारी!
माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा औरंगाबाद विभागात 170 लाख 12 हजार 185 मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ज्यात विभागात 15 सहकारी आणि 10 खासगी असे एकूण 25 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलेले आहे. तर 18 जानेवारीपर्यंत 55 लाख 47 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे, यातून 49 लाख 19 हजार क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे परिस्थिती?
गेल्यावर्षी उसाच्या हंगामात लागवड क्षेत्र वाढल्याने मोठा गोंधळ उडाला होता. कारखान्यात नंबर लागत नव्हता, तर ऊसतोडणीसाठी अक्षरशः मजूर देखील मिळत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गेलाच नाही. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतात उभ्या उसाला पेटवून दिले. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता यंदा देखील गेल्यावर्षीपेक्षा 25 टक्के अधिक उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा गेल्यावर्षीप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची भीत शेतकऱ्यांमध्ये आहे. विशेष यंदा साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. पण त्याचा किती परिणाम होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
ऊस गाळप आकडेवारी!
जिल्हा | एकूण ऊस गाळप (मे.टनमध्ये) |
औरंगाबाद | 11 लाख 22 हजार 508 |
जालना | 11 लाख 47 हजार 423 |
बीड | 19 लाख 93 हजार 809 |
जळगाव | 5 लाख 43 हजार 190 |
नंदूरबार | 7 लाख 40 हजार 512 |
एकूण | 55 लाख 47 हजार 442 |
इतर महत्वाच्या बातम्या: