Nanded Rain Update : नांदेडसह (Nanded) शेजारच्या जिल्ह्यात झालेल्या पावसाने (Rain) नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून प्रवाहित झालीय. नांदेडला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी बंधारा (Vishnupuri Dam) पूर्णपणे भरलाय. त्यामुळे, विष्णुपुरी बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन दरवाजातून 32 हजार 266 क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला होता, त्यानंतर आता सकाळी आणखी एक दरवाजा उघडण्यात आला आहे. दरम्यान, विष्णुपुरी बंधारा काठोकाठ भरल्याने नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले होते. मात्र, असे असतांना जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यात आता गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळत आहे. तर, जिल्ह्यातील किनवट तालुक्यात जुलै महिन्यात तब्बल सहा वेळा, नंतर ऑगस्टमध्ये एकदा तर सप्टेंबरमध्ये तीनदा मिळून एकूण दहा वेळा विविध मंडळांत अतिवृष्टी झालेली आहे. किनवट तालुक्यातील नऊ महसूली मंडळापैकी इस्लापूर मंडळात सर्वात जास्त सातवेळेस तर शिवणी मंडळात सहा वेळा अतिवृष्टी झाली असून, बोधडी व जलधारा मंडळात पाच वेळा, सिंदगीमोहपूर मंडळात चार वेळा, किनवट, दहेली व उमरी बाजार मंडळात तीनवेळा तर मांडवी मंडळात एकदा अतिवृष्टी झालेली आहे.


नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली 


मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच छोटी-मोठी धरणे भरली जात होती. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची देखील चिंता नव्हती. परंतु, यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. त्यातच अपेक्षित पाऊस देखील झाला नसल्याचे चित्र होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला होता. तर, नांदेड जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली होती. त्यातच आता मागील तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली असून, धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 


पिकांचे नुकसानही...


मागील तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण, असे असतांना दुसरीकडे काही भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहेत. जोरदार पावसामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे नुकसान झाले आहेत. कापूस, सोयाबीन यासह अनेक पिकांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chandoli Dam : सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस, चांदोली धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, 1500 क्युसेस पाण्याचा विसर्ग