नांदेड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क एका आमदाराने (MLA) पोलीस (Police) अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे. विना नंबरची दुचाकी सोडून देण्याची मागणी आमदाराने केली होती, मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने या आमदाराला राग आला. त्यामुळे तुम्हाला निलंबित करतो आणि अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारणार असल्याची धमकी या आमदाराने दिली. आमदाराने दिलेल्या धमकीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याची नोंद थेट स्टेशन डायरीत केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. श्यामसुंदर शिंदे असे या आमदाराचे नाव असून, ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत.
विना नंबरची दुचाकी कारवाई न करता सोडून देण्यावरून आमदारांनी फोनवरून पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांना धमकी दिल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनीही कडक भूमिका घेत स्टेशन डायरीमध्ये याची नोंद केली. नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडच्या लोहा शहरातील रोडरोमोमियो आणि चोरीच्या दुचाकीबाबत पोलीसांकडून कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान एका माजी नगरसेवकाची विना नंबरची दुचाकी पोलिसांना दिसून आल्याने त्यांनी त्याला अडवून चौकशी सुरु केली. मात्र, त्याच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आणि संशय आल्याने पोलीसांनी ही दुचाकी पोलीस ठाण्यात नेली. पण, या दुचाकीवर कारवाई न करता सोडून द्यावी यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा पोलीस उपनिरीक्षकाला आला. तसेच कोणतेही कारवाई करू नका आणि ती गाडी सोडून द्या असे आदेश आमदार शिंदे यांनी दिले. तसेच दुचाकी न सोडल्यास थेट निलंबित करण्याची थेट धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षकांनी दुचाकी सोडण्यास नकार दिल्याने आमदार शिंदे यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना फोन लावून त्यांना देखील दुचाकी सोडण्यास सांगितले. तसेच चिंचोळकर यांनाही तारांकीत प्रश्न करू आणि तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी दिली. यावरून, पोलीसांनी थेट स्टेशन डायरीमध्ये या सर्व घटनेची नोंद केली आहे. त्यामुळे आता आमदार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, विद्यमान आमदाराने पोलिसांना निलंबित करण्याची थेट धमकी दिल्याची पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद केल्याने पोलीस दलात याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: