सांगली : पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्र दरवाजे 0.25 मीटरने उचलून 1500 कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चांदोली धरण सध्या 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात जितका पाऊस पडतो आहे तितका विसर्ग करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून जलविद्युत प्रकल्पातून 1500 कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. आवकही 1455 क्युसेक्स होती.


वीजनिर्मिती केंद्रातून जास्तीत जास्त 1821 पाण्याचा विसर्ग करता येतो. धरणात आवक होणाऱ्या पाण्याची आकडेवारी पाहता विद्युत ग्रहातून ती विसर्ग करणे शक्य होते. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याची गरज नव्हती. चांदोली जलविद्युत प्रकल्पात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक विसर्ग करणे गरजेचे असल्यामुळे वक्र दरवाजे 0.25 मीटरने उचलून 1500 क्युसेक्स ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 


मंगळवारी रात्री उशिरा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे उघडलेले वक्र दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. वरिष्ठांना कल्पना देऊन त्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला जाणार आहे. आज अखेर चांदोलीत 1718 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.


सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले


दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात (Sangli Rain Update) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्याल मंगळवारी पावसाने चांगलले झोडपून काढले. सांगली मिरज तासगाव भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाऊस नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. 


अनेक ठिकाणी पाणी साचले 


पावसाने सांगलीत चांगलीच दैना केली. स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका परिसर, सिटी पोस्ट चौक, राम मंदिर कॉर्नर, 100 फुटी रस्ता, वालचंद कॉलेज रस्ता याठिकाणी पाणीच पाणी आले होते उपनगरांमध्येही पाणी साचले होते. दरम्यान मिरज तालुक्यामध्येही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सुमारे एक तास पावसाने झोडपून काढल्याने मोठा दिलासा मिळाला. पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तासगाव शहर आणि तालुकाच्या पूर्व भागाला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग दोन अडीच तास पडलेल्या पावसामुळे पूर्व भागातील नाल्यांना पाणी वाहू लागले. मणेराजुरीसह सावळज, मांजर्डे, चिंचणी, येळावी, सावर्डे, वाघापूर योगेवाडी, उपळावी, कौलगे, लोंढे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली


इतर महत्वाच्या बातम्या