नांदेड : शहरातील कॅनॉल रोड भागात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोळीबारचा (Firing) थरार पाहायला मिळाला. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला असतांना, आरोपीकडून पोलिसांनाच खंजीरचा धाक दाखविण्यात आला. त्यामुळे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी आरोपीला गोळी मारून जखमी केले. त्यानंतरही पळून जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अब्बू शुटर उर्फ आवेज शेख असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत असलेला आरोपी दिपक भोकरे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
नांदेडच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला व वॉन्टेड आरोपी अब्बू शुटर उर्फ आवेज शेख डी मार्ट परिसरात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शोध शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा लावला. पोलीस आपल्याला ताब्यात घेणार असल्याचे कळताच आवेजने एका कर्मचाऱ्यावर खंजरने हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतर पोलिसांना देखील त्याने खंजरचा धाक दाखवून, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, प्रसंगावधान राखत सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी त्याच्या मांडीवर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतले. हा थरार बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास डी मार्ट परिसरात घडला.
नेमकं काय घडलं?
शहरातील देगलूर नाका भागातील रहिवासी व अनेक पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी अवेज अनेक वर्षांपासून फरार आणि पोलिसांना वॉन्टेड होता. पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. अवेज हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास पूर्णा रोडवरील डी मार्ट भागात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी अवेज पळून जात होता. त्यामुळे, स्थागुशा पथकातील मोतीराम पवार यांनी त्याला जवळ जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने खंजरने पवार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखत सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी अवेजवर फायरिंग केले. यात त्याच्या मांडीला दुखापत होऊन तो जखमी झाला. लगेच त्याला झडप घालून स्थागुशा पथकाने पकडले. रुग्णवाहिका मागवून त्याला उपचारासाठी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
'रोडरोमिओं'वर कारवाई, गाडी पकडली म्हणून आमदाराची थेट धमकी; पोलिसांनीही स्टेशन डायरीला नोंद घेतली