नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही आमदार, खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामेही दिले आहेत. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव गावातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. संपूर्ण गावातून राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवला.


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला फक्त आश्वासन दिलं. यावर सकल मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव गावात 1 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका न घेणाऱ्या राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.


राज्य सरकारचा निषेध


या वेळी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. 'एक मराठा लाख मराठा', 'जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'राज्य सरकारचा निषेध असो', अशा विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी डोलीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे फोटो असलेला बॅनर डोलीला बांधून त्याला चपलांचा हार घातला, चार खांदेकरी अशी प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली.


नागरिकांनी फोडला टाहो


अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या नागरिकांनी अक्षरशः टाहो फोडला होता. तसेच महिलांनी या वेळी या डोलीवरील फोटोंना जोडे मारले. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा संपूर्ण गावभर काढण्यात आली. शेवटी सार्वजनिक ठिकाणी या बॅनरवर परंपरेनुसार अग्नि देण्यात आला. तसेच या वेळी त्यांचा दशक्रिया विधीदेखील करण्यात आला. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.


नगरच्या बुरूडगावात आरक्षणासाठी आंदोलन


अहमदनगरच्या बुरूडगावात सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तिरडीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो असलेला बॅनर बांधण्यात आला होता. या अंत्ययात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला बुरुडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली. गावातून निघालेली ही अंत्ययात्रा मुख्य चौकात आली. यावेळी राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या तिरडीला अग्नीडाग देण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली. या आंदोलनात महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.


ही बातमी वाचा: