नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. कालपासून एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नांदेड डेपोची बस नागपूरला जात असतांना पैनगंगेच्या पुलावर अज्ञाताकडून पेटवून देण्यात आली होती. तर, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसवर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी बस (ST Bus) बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे. परिणामी महामंडळाचे आतापर्यंत 55 ते 60 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद नांदेडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. असे असतांना काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा दिसत आहे. शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. तर, रविवारी पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय. त्यामुळे पोलिसांच्या सुचनेनुसार आता जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले अधिकारी...
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देतांना एसटी महामंडळाचे अधिकारी यासिन खान म्हणाले की. “सध्या नांदेड आगारच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, नांदेड जिल्ह्यातील इतर सर्वच आगारातील बस देखील बंद आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी किमान 10 लाखाचे नुकसान झाले. हदगांव तालुक्यात पेटवण्यात आलेल्या एसटी बसचे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकूण 55 ते 60 लाखांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकारी यासिन खान म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील 9 आगारातील 547 बसेस जागेवरच
माहूर परिसरात रविवारी सकाळी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाने आंदोलनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही दिवस एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 9 आगारातील 547 बसेस जागेवरच अडकून पडल्या आहेत. तर याचा फटका प्रवाशांना बसतांना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: