Nanded News: मुलीवर करणी (Black Magic) केल्याच्या संशयावरुन एका वृद्धाचा खून (Murder) करण्यात आल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात (Nanded District) गेल्या अठवड्यात समोर आला होता. मुलीवर करणी केल्याच्या संशयावरुन बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे एका वृद्धाचा खून करण्यात आला होता. मात्र यात फक्त खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या प्रकरणात अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठ पुराव्यानंतर महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील 85 वर्षीय वृद्ध हणमंत काशिराम पांचाळ यांचा गावातील तिघांनी अमानुषपणे मारहाण करत हत्या केली होती. ही घटना 1 मार्च रोजी गागलेगाव येथे घडली होती. या प्रकरणात आरोपी वामन डूमणे व अन्य दोघांनी मुलीवर भानामती, करणी केल्याचा आरोप करीत वयोवृद्ध हणमंत पांचाळ यास चिंचेच्या झाडास बांधून त्यानंतर मंदिराच्या पारावर गावकऱ्यासमक्ष मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींना अटक केली होती.  तसेच या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. 


पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरीही, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकत्यांनी ठाण्यात धाव घेत यात अंधश्रद्धा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची मागणी केली. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दीघे यांनी घडलेल्या प्रकाराची तपासणी करुन सदर गुन्ह्याची कलम वाढविले आहे.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्याला यश 


गागलेगाव येथील पुजारी हणमंत पांचाळ यांचा करणी करत असल्याच्या संशयातून खून करण्यात आला होता. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हाटकर, जिल्हा सचिव कमलाकर जमदाडे, नायगावचे अध्यक्ष हणमंतराव खांडगावकर, भाऊराव मोरे यांनी पोलिसांशी भेट घेवून सदर कलम लावण्याचा आग्रह धरला. त्यामुळे श्रद्धा निर्मूलन समितीचा दबाव पाहता अखेर पोलिसांनी  गुन्ह्याची कलम वाढवत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


काय आहे प्रकरण? 


नांदेड जिल्ह्यातील गागलेगाव तालुका बिलोली येथील हनमंत काशीराम पांचाळ यास तू भानामती केली असे म्हणून काही लोकांनी चिंचेच्या झाडाला बांधले होते. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यामध्ये हनमंत काशीराम पांचाळ यांचा मृत्यू झाला होता. ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


इतर महत्वाच्या बातम्या: 


भानामती केली म्हणून एकाची हत्या, नांदेडमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल