Nanded Latest Crime News Update : नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, भानामती केली म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन व्यक्तींना तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील गागलेगाव तालुका बिलोली येथे ही धक्कादायक घटना घडली. येथील हनमंत काशीराम पांचाळ यास तू भानामती केली असे म्हणून काही लोकांनी चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये हनमंत काशीराम पांचाळ यांचा मृत्यू झाला. ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, गागलेगाव तालुका बिलेली येथील हनमंत काशीराम पांचाळ (वय 85 वर्ष ) यास तू वामन डुमणे यांच्या मुलीवर कर्णी, भानामती केली, असा आरोप करण्यात आला. रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे रा. गागलेगाव व दयानंद वाघमारे रा. कागंठी या तिघांनी संगणमत करून त्यांच्याच घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाला पांचाळ यास बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये पांचाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारोती नागनाथ पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे, आणि दयानंद वाघमारे या तिघांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रजिस्टर नंबर 33/2023 कलम 302 ,342, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे हे करत आहेत. ही घटना घडल्याचे समजताच धर्माबाद येथील उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यास भेट देऊन सदरील घटनेची सविस्तर माहिती घेतली.
सदरील घटनेतील तीन आरोपीपैकी वामन डुमणे व दयानंद वाघमारे या दोघांना रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रत्नदीप वामन डुमणे यांचा पोलीस शोध घेत आहेत. हनमंत काशीराम पांचाळ यांचे बिलोली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गागलेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांनी हौतात्म्य पत्करले. 21 व्या शतकात आपण वावरत आहोत.शाहू, फुले, आंबेडकरांचा आपण वारसा सांगतो. अशा समाजात या प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राम शिंदे यांनी दिली आहे.