Nanded Suicide News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी मुदखेड पोलिसात आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा प्रकाश शिंदे, असे मयत मुलीचे नाव आहे. तर उद्धव भाऊराव शिंदे असे छेडछाड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात राहणारी ऋतुजा प्रकाश शिंदे या तरुणीला गावातील उद्धव भाऊराव शिंदे नेहमी त्रास देत होता. रस्त्याने जाता-येता उद्धव शिंदे हा तिला वारंवार अश्लील चाळे आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायचा. याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केल्यानंतरही हा प्रकार थांबत नसल्याने तरुणीने बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, उद्धव शिंदे विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 


आरोपीच्या आई-वडिलांना सांगूनही फरक पडला नाही 


ऋतुजा ही गावातून जात असताना आरोपी उद्धव भाऊराव शिंदे हा अश्लील चाळे करीत होता. काही दिवस ऋतुजाने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु उद्धवकडून सुरु असलेला त्रास वाढतच गेला. त्यामुळे ही बाब तिने आई-वडिलांना सांगितली. ऋतुजाच्या आई-वडिलांनी आरोपी उद्धव याचे घर गाठून त्याच्या आई-वडिलांना मुलाला समज देण्याबाबत सांगितले. मात्र याचा काहीच फरक पडला नाही. उद्धवकडून सुरु असलेला त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे या प्रकाराने गावात बदमानी होईल या भीतीने ऋतुजाने राहत्या घरी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी उद्धव भाऊराव शिंदे विरोधात मुदखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 


शिंदे कुटुंबावर शोककळा


मयत ऋतुजाला आरोपी उद्धव ठाकरे नाहक त्रास देत होता. सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. तिने आई-वडिलांना छेडखानी होत असल्याबाबत माहिती दिली होती. तिच्या आई-वडिलांनी आरोपीची समजूतही घातली. तसेच त्याच्या आई-वडिलांची भेट घेऊन आपल्या मुलाला समज देण्याबाबत देखील कळवले. परंतु त्रास काही कमी होत नसल्याने ऋतुजाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ऋतुजाने टोकाचे पाऊल उचलल्याने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded: बायको नांदायला येत नसल्याने नवरोबाचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, नांदेडच्या शोभानगर भागातील प्रकार