नांदेड : जिल्ह्यात पशुमध्ये लम्पी चर्मरोगाच्या (Lumpy Skin Disease) प्रमाणात वाढ दिसून येत आहे. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुपालकांसह ग्रामपंचायत पातळीपर्यंत पशु संवर्धन विभागाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. शंभर टक्के लसीकरण व आजारी जनावरे वेगळी काढून त्यांच्या सुश्रृषेसह लसीकरण व काळजी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. तर, जिल्ह्यात आजच्या घडीला 512 पशुंमध्ये लम्पी (Lumpy) आजार आढळून आला आहे. यात वासरांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे. लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. 


जिल्ह्यात आजच्या घडीला 512 पशुंमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. यात वासरांचे प्रमाण अधिक आहे. पशुपालकांमध्ये लम्पी बाबत अधिक जागृती करण्यावर पशुसंवर्धन विभागाने भर देण्यासमवेत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर त्यांच्या सहभागातून जनावरांचे गोठे व जनावरांची फवारणी करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. मृत जनावरांची विल्हेवाट ही दिलेल्या निर्देशाप्रमाणे केली पाहिजे. याचबरोबर आपला जिल्हा दोन राज्यांच्या सीमांवर असल्यामुळे जिल्ह्यात अन्यत्र ठिकाणावरून आजारी जनावरे येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेतील पाहिजे. आठवडी बाजाराच्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प लावून पशुपालकांना जनावरांच्या निगा व सुश्रृषेबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


आतापर्यंत 466 पशुधन मृत पावले...


जिल्ह्यात आजवर एकुण 75 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग बाधित गावांची संख्या 197 असून, बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 643 एवढी आहे. एकुण बाधित गावे 480 एवढे असून 3 हजार 618 बाधित पशुधनापैकी 2 हजार 638 पशुधन आजारातून बरे झाले आहेत. 513 पशुधनावर औषोधोपचार सुरू असून 10 पशुधन अत्यवस्थ रुग्णामध्ये गणले आहेत. 466 पशुधन मृत पावले आहेत. आजवर सुमारे 1 कोटी 95 लाख 5 हजार एवढ्या रक्कमेचे अर्थसहाय्य मृत झालेल्या पशुधनाच्या पशुपालकास वितरीत करण्यात आले आहे.


बैठकीत यांची उपस्थिती...


लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Lumpy Skin Disease: लम्पीबाबत दिरंगाई केल्यास तात्काळ कारवाई करणार; तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा