Lumpy Skin Disease : गेल्यावर्षी राज्यात थैमान घालणाऱ्या पशुधनामधील लम्पी (Lumpy) आजाराने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कारण राज्यातील अनेक भागात लम्पी बाधित पशुधन समोर येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, याबाबतीत उपयोजना करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, लम्पीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांनी दिला आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थान येथून राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. तसेच, दूरदृश्यप्रणालीद्वारे आयुक्त हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.


दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करणार


लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. त्यामुळे भीती बाळगू नये. मृत पशुधनाविषयी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. साथीचे इतरही आजार पशुधनास होऊ शकतात, यावरही उपचार करावेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर आयुक्त किंवा आपण स्वत: उपलब्ध राहू. लम्पी आजार निर्मूलनासाठी सबंधित कोणत्याही स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. 


आतापर्यंत 73 टक्के गोवर्गीय पशुधनाचे Goat Pox लसीकरण


यावेळी बोलतांना मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात एकूण 1 कोटी 41 लाख गोवर्गीय पशुधन आहे. आतापर्यंत 73 टक्के गोवर्गीय पशुधनाचे गोट पॉक्स(Goat Pox) लसीकरण झाले आहे. 1.02 कोटी उर्वरित लसीकरण एक आठवड्यात पूर्ण करण्यासाठी नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मार्च 2023 ते 20 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 32 हजार 70 पशुधन लम्पी बाधित आहे. त्यापैकी 20 हजार 898  बरे झाले असून सक्रिय रुग्ण 8 हजार 623, मृत पशुधन 2 हजार 775 सक्रिय पशुरुग्ण असणारे जिल्हे 25  असून, सन 2023-24  मध्ये 1.41 कोटी लसी उपलब्ध असल्याचे विखेंनी सांगितले.


भरपाईच्या प्रस्तावांना तत्काळ मान्यता


या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना व मृत पशुधनाची विल्हेवाट इत्यादींबाबत काटेकोर पालन करावे. सन 2023-24 मध्ये या आजाराने मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून पात्र प्रस्तावांना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी. बाजार भरविण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश देणे. आंतरराज्य, आंतरजिल्हा बाधित जनावरांच्या वाहतुकीच्या अनुषंगाने या गोवंशीय पशुंचे 28 दिवसांपूर्वी लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनाच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यासंबंधीचे तसेच आवश्यकतेनुसार बाजार भरविण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra IAS Transfer: राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांचा वनवास संपला, 'या' खात्याची जबाबदारी