नांदेड : दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा  (Loha malegaon Yatra) प्रसिद्ध आहे. ही यात्रा जशी सर्वात मोठी म्हणून प्रसिद्ध आहे तशी ती जनावरांच्या बाजारासाठी खास ओळखली जाते. महाराष्ट्रातील एकमेव उंट खरेदी विक्री बाजार याच यात्रेत असतो. यावेळीही उंटांचा बाजार लागलाय पण उंटाच्या किमती मात्र घसरल्या आहेत. 


या बाजारात आलेले उंट हे डौलदार आहेत. मोठ्या संख्येने दिसत असलेले उंट पाहून हे राजस्थानातील चित्र असल्याचं अनेकांना वाटेल. पण हे चित्र राजस्थानातील नाही तर  नांदेड जिल्ह्यातील माळेगावचे  चित्र आहे. इथं महाराष्ट्रातील एकमेव असा उंटांच्या खरेदी विक्रीचा बाजार भरतो.


उंटांच्या किमती घसरल्या


माळेगावची यात्रा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या या यात्रेत यंदाही मोठ्या प्रमाणात उंट दाखल झाले आहेत. यंदा मात्र या उंटांच्या किमती घसरल्या आहेत. अगदी 45 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत.


महाराष्ट्रात उंटांचा वापर केवळ मोठ्या शहरांत मुलांना फेरी मारण्यासाठी होतोय. लग्नात डान्ससाठीही याचा उपयोग होतोय. उंटांच्या दोन जाती असतात. एक कारवार अन दुसरी देशी. उंटांना किती दात आलेले आहेत त्यावरून उंटाचे वय ओळखले जाते. वयानुसार त्याची किंमत ठरते.


उंटांना सांभाळण्यासाठी फारसा खर्च लागत नाही. पण शोभा वाढवण्यासाठी कुणीही उंट खरेदी करत नाही. महाराष्ट्रात उंटावरून सामान वाहून नेण्याची रीत नाही. त्याची अन्य उपयोगिता महाराष्ट्रात नसल्याने इथे उंटांच्या किमती मात्र घसरल्या आहेत. आज जुनी मोटार सायकल खरेदी करायची म्हटलं तरी 50 हजार रुपये लागतात. पण उंट खरेदीसाठी मात्र त्याहून कमी पैसे मोजावे लागत असल्याचं चित्र आहे.


नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रा (Khandoba Yatra)  ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून दशकांपासून ओळखल्या जाते. दरम्यान या यात्रेस घोड्याचे माळेगाव तर गमतीने उचल्याचे माळेगाव म्हणून ओळखलं जाते. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभरातून उंट, घोडे,गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात. यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.


ही बातमी वाचा: