Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल जाहीर केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी बालाजी कल्याणकर यांना पात्र ठरवले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या बालाजी कल्याणकर यांना पहिल्यांदाच शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बडे नेते डी. पी. सावंत यांचा पराभव करत विधानसभा गाठली. विशेष म्हणजे नगरसेवक असलेल्या बालाजी कल्याणकर यांना पक्षाने थेट विधानसभेत पाठवल्याने पक्षात निष्ठावांतला संधी मिळते अशी त्यावेळी शिवसैनिकांमध्ये चर्चा होती. मात्र, त्याच शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीच्या वेळी बंडात सहभागी होणाऱ्या पहिल्या फळीत बालाजी कल्याणकर यांचा देखील समावेश होता. त्यामुळे, नांदेडच्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळाला होता.
कोण आहेत बालाजी कल्याणकर? (Who is Balaji Kalyankar)
नांदेड जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये विजयी झाले. त्यांच्या आमदारकीची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ते नांदेड महानगरपालिकेत नगरसेवक होते. विशेष म्हणजे नांदेड महानगरपालिकेत देखील कल्याणकर हे एकमेव शिवसेनेचे नगरसेवक होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागली. अशात एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचा सामना थेट काँग्रेसचे बडे नेते डी. पी. सावंत यांच्यासोबत होता. परंतु, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात एमआयएमने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे, मुस्लीमबहुल भाग असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसची मते विभागली गेली आणि याचा फायदा बालाजी कल्याणकर यांना झाला.
निवडणुकीत सर्वाधिक निधी, तरीही 'गद्दारी'
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक निधी बालाजी कल्याणकर यांना दिला असल्याचे बोलले जाते. "पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आनंद जाधव यांनी केला होता. कोणत्याही आमदाराला एक कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला नव्हता. मात्र, कल्याणकर यांना दीड कोटी देऊनही त्यांनी गद्दारी केली, असेही जाधव म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: