पालघर: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा असताना पुन्हा एकदा भाजपकडून पालघर मतदारसंघावर (Palghar Lok Sabha) दावा करण्यात आला आहे. पालघर लोकसभेवर भाजपचाच खासदार निवडून येणार असं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं. सध्या पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे असून त्यावर सेनेने या आधीच दावा केला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या या ताज्या वक्तव्यानंतर महायुतीत पालघर लोकसभेवरून तिढा वाढणार असल्याचं चित्र आहे. 


गेल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालघर लोकसभेच्या निवडणुकीत धनुष्यबाणावर राजेंद्र गावितच खासदारकी लढवणार असल्याचा दावा केला होता. आता भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. 


शिवसेना आता राहिली कुठे?


खरी शिवसेना कोणती आणि डुप्लिकेट शिवसेना कोणती हे येत्या निवडणुकीत सिद्ध होईल या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी टीका केली. शिवसेना राहिली कुठे? होती नव्हती ती सगळी शिवसेना संपली. आता राहिलेत ते पण आमच्याकडे येतील असं ते म्हणाले. 


संजय राऊत शिवसेनेत शिवसैनिक म्हणून आला नाही तर तो संपादक म्हणून सामनामध्ये आला, त्यामुळे शिवसेनेबद्दल त्याला फारसं माहिती नाही असंही राणे म्हणाले. 


शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अवघ्या काही तासातच घुमजाव केलं आहे. मी तसं बोललो नाही, मात्र पत्रकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. मात्र मी राणे आहे, मी वादाला घाबरत नाही. मागील साठ वर्षांपासून वादातूनच मी इथपर्यंत पोहचलो आणि सगळी पदं उपभोगली असल्याचं ते म्हणाले. 


राजेंद्र गावित हे धनुष्यबाणावरच लढणार, शिवसेनेचा दावा


महायुतीतील भाजपच्या या दाव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. राजेंद्र गावित हे गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते, त्यामुळे या मतदारसंघावर सेनेचाच दावा असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच या ठिकाणी राजेंद्र गावितच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. 


2019 सालच्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांची बाजी


2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 48.30 टक्के अर्थात 5 लाख 15 हजार मते मिळाली होती. तर, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 46.90 टक्के अर्थात 4 लाख 91 हजार 596 मते मिळाली. गावित यांनी 23 हजार 404 मतांनी विजय मिळवला. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता. 


ही बातमी वाचा: