Farmer Success Stories: शेतात राबून देखील अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नसल्याचे अनेकदा म्हटले जाते. पण नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) एका अपंग तरुणाने आपल्या कष्टाच्या जीवावर तब्बल 10 एकर जमीन फुलवली आहे. फक्त शेतीच फुलवली नाही तर त्यातून भरघोस असे उत्पन्न देखील मिळवले आहे. दोन पायांनी अपंग असून देखील या तरुणाने आपल्या कष्टाच्या जीवावर आणि जिद्दीवर शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून आपल्या दोन बहिणींची लग्ने देखील केली आहेत. त्यामुळे त्याची ही प्रेरणादायी गोष्ट नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. 


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील गजानन नरोटे हे बालपणापासून दोन्ही पायांनी अपंग आहे. त्यांचे शिक्षण 12 पर्यंत झाले. पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती, परंतु आई-वडिलांकडून शेतीमधील कामे होत नसल्याने शेतीची व घराची जबाबदारी गजाननवर पडली. त्यामुळे इच्छा असून देखील शिक्षण अर्धवट राहिले. पुढे त्याने पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन्ही पायांनी अपंग असताना शेती करणे त्याच्यासाठी अवघड होते. परंतु जिद्द आणि चिकाटी अंगात असल्याने त्याने अपंगत्वावर मात शेती करायला सुरुवात केली.


शेती करताना सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण कालांतराने कामाची सवय झाली. जिद्दीपुढे काहीही अशक्य नसल्याच दाखवत त्याने पायांनी अपंग असताना शेतीमधील सर्व कामे स्वतः करायला सुरुवात केली. पिकांना पाणी देणे, नांगरटी, पेरणी, निंदनी, खुरपणी आदी कामे तो स्वतः करतो. तसेच त्याच्याकडे दुधाची तीन जनावरे आहेत. त्यांचे स्वतः दूध काढतो आणि बाजारात विकतो.


दोन बहिणींचे लग्न केले


सुरुवातील स्वतः तीन एकरपासून गजानने सुरवात केली. पुढे आणखी इतरांची सात एकर जमीन करण्यासाठी घेतली. त्यामुळे 10 एकरमधून त्याला चांगले उत्पन्न होऊ लागले. तब्बल 11 वर्षांपूर्वी शेती कामात उतरलेल्या गजाननने आतापर्यंत लाखो रुपयांचं उत्पन्न काढले आहे. याच काळात त्याने आपल्या दोन बहिणींचे लग्न केले. तसेच आता तिसऱ्या बहिणीचे देखील 9 मे रोजी लग्न आहे. विशेष म्हणजे घरातील लग्न कार्यात देखील गजानन पुढेच असतो. घरातील सर्व कामे तो स्वतः करीत आहे. पत्रिका वाटप करणे, लग्नाला लागणारे साहित्य खरेदी करणे आदी कामे स्वतःकरीत आहे. दोन पाय नसताना देखील त्याने कष्टाच्या जीवावर केलेलं हे कार्य आणि मिळवलेलं यश अनेकांसाठी आज प्रेरणादायी ठरत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


यशोगाथा! शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड, महिन्याला लाखोंचं उत्पन्न; 30 गुंठ्यावरून आता चार एकर जमीन झाली