Marathwada Unseasonal Rain: मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मराठवाड्यात (Marathwada)  मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. मात्र आता मे महिना लागला असताना देखील अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) काही थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आज नांदेड (Nanded) आणि हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सतत होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस काही विश्रांती घायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. 


आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आज देखील पाहायला मिळाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील अनेक गावांत आज सांयकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. देगलूरसह बिलोली, मुखेड आणि नायगांव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. सातत्याने बरसणाऱ्या या पावसामुळे नांदेडमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झालंय. गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात रोज कुठे न कुठे पाऊस हजेरी लावतोय, त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहे. तर शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. 


नांदेडप्रमाणे आज हिंगोली जिल्ह्यात देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ तालुक्यासह ग्रामीण भागात आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. केळी,पपई यासह भाजीपाला वर्णीय पिकांचे नुकसान होत आहे. तर जोरदार सुरु असलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. तर या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. 


नांदेड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा...


नांदेड जिल्ह्यात उद्या (4 मे) रोजी देखील ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उद्याच्या दिवशी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच वातावरण बदल होऊन पाऊस पडेल ही शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Onion : पावसामुळे कांदा सडला, भाव नसल्याने निराशा; सटाण्यात शेतकऱ्याकडून कांद्यावर अंंत्यसंस्कार