नांदेड: राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला लाडक्या बहीण योजनेमुळे प्रचंड मोठे यश मिळाले होते. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. त्यामुळे महायुतीला महिलावर्गाची मोठ्याप्रमाणावर मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरुन 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक संपल्यानंतर या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसली त्याचेच आकर्षण दाखवून भाजपकडून सध्या सुरु असलेल्या पक्षनोंदणी अभियानात महिलांना आकृष्ट करुन घेतले जात आहे. नुकताच नांदेड जिल्ह्यात हा प्रकार समोर आला. 


नांदेडच्या सांगवी परिसरात भाजपकडून  पक्ष नोंदणीसाठी संघटन पर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अनेक लाडक्या बहि‍णींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळवून देतो, असे सांगून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बोलावले होते. त्यामुळे याठिकाणी अनेक महिला केवायसी आणि इतर कागदपत्रे घेऊन आल्या होत्या. लाडक्या बहि‍णींनी या शिबिरात मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवायसी आणि इतर माहिती घेऊन भाजपचे कार्यकर्ते या लाडक्या बहि‍णींना पक्षाचे सदस्य करुन घेत होते. याठिकाणी आलेल्या अनेक महिलांना आपल्याला 2100 रुपये मिळतील, असे सांगून याठिकाणी बोलावण्यात आल्याचे स्पष्टपणे सांगितले. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, अडीच लाखांपेक्षा कमी उत्त्पन्न असणाऱ्या आणि घरात चारचाकी वाहन नसणाऱ्या महिलाच योजनेसाठी पात्र आहेत. परंतु, या निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनीही योजनेचे अर्ज भरुन 1500 रुपये मिळवले होते. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर अशा अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी सुरु झाली आहे. यामध्ये अपात्र आढळणाऱ्या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे घेतलेले पैसे पुन्हा वसुल करण्याचे काम सुरु झाले आहे.


'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक नवी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सुधारित निकषाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. समजा एखाद्या महिलेला नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये मिळत आहेत आणि तिला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयेही मिळत असतील तर तिला लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपयेच मिळतील.


आणखी वाचा


Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा