नागपूर : नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत एका गुन्हेगाराने रस्त्यावर पळवत एका महिलेची हत्या केली आहे. नंदनवन परिसरात आरती गिरडकर या महिलेला अनेकांच्या देखत गुंड वृत्तीच्या बंटी टापरे याने जीवे मारले. पोलीस जरी या मागे पार्किंगचा वाद असल्याचे सांगत असले तरी नातेवाईकांनी या घटनेमागे आरोपीच्या नेहमीच्या गुन्हेगारीच्या कृत्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई न करणे हे कारणीभूत असल्याचे आरोप केले आहेत.
हल्लेखोर एका महिलेच्या मागे खंजीर घेऊन धावतोय. थोड्या अंतराने परिसरातील काही नागरिक आणि त्या महिलेचा 8 वर्षांचा मुलगा तिच्या आईला वाचवण्यासाठी धावतोय. अन् अवघ्या काही सेकंदात हल्लेखोर मुलाच्या देखत आईला मारुन टाकतो. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये चित्रपटाला शोभणारी असली तरी हे घटनाक्रम नागपुरात काल रात्री प्रत्यक्षात घडले आहे. नंदनवन परिसरात आरती गिरडकर या महिलेची हत्या पार्किंगच्या वादातून करण्यात आली. आरती नंदनवन वस्तीत गल्ली क्रमांक 5 मध्ये राहायच्या. काल रात्री आवश्यक किराणा सामान घ्यायला त्या दुचाकीने गेल्या होत्या. पाऊस येत असल्याने लगबगीने परत आल्या आणि घरासमोर भिंतीला चिटकवून (दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही) आपली दुचाकी उभी केली. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या बंटी टापरे नावाच्या गुन्हेगाराने पार्किंगवरुन जुना वाद उकरुन काढला आणि तिथे दुचाकी लावू नका, तिथे मला माझी टाटा मॅजिक ही चारचाकी उभी करायला अडचण होते असा तर्क पुढे केला. आरती यांनी माझी गाडी माझ्या घरासमोर उभी केली आहे असे सांगत आपल्या घराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आरोपी बंटी हातात खंजीर घेऊन आरती यांच्या दिशेने धावला.
नागपुरात तथाकथित अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेचा विनयभंग करत मारहाण
भररस्त्यात सर्वांसमक्ष हत्या
जीव वाचवण्यासाठी आरती गल्लीतून बाहेर मुख्य रस्त्याच्या दिशेने धावल्या. पाठीमागे हल्लेखोर बंटी आणि त्याच्या पाठीमागे परिसरातील काही नागरिक आणि आरती यांचा 8 वर्षांचा मुलगाही धावला. थोडा पुढे जाऊन मुख्य रस्त्याच्या मधोमध हल्लेखोराने आरती यांना गाठले आणि त्यांच्यावर अनेक वार करत त्यांना जखमी केले. लोकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच आरती यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेमागे पार्किंगचा वाद असून मर्यादित जागेत आरोपी बंटी टापरे याची चारचाकी आणि आरती यांची दुचाकी उभी करण्यात अडचणी यायच्या त्याच जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नागपुरात तडीपार गुंडाकडून तरुणाची हत्या
या घटनेला बंटी टापरेच्या कृत्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत
दरम्यान, आरतीच्या भावाचा आरोप आहे की या घटनेमागे गुन्हेगारी वृत्तीच्या बंटी टापरेच्या कृत्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या बंटीच्या घरी नेहमीच जुगार आणि इतर बेकायदेशीर कृत्य चालायचे. मात्र, पोलीस त्यावर थातूरमातूर कारवाई करुन सोडून द्यायचे. पोलिसांना नेहमी आरतीच माहिती देते अशी शंका आरोपी बंटीला होती. त्याने त्याचाच वचपा काढण्यासाठी पार्किंगचा वाद पुढे करुन ही हत्या केली आहे, असा आरोप आरती यांच्या भावाने केला आहे.
आधीच गुन्हेगारीने त्रस्त असलेल्या नागपुरात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून गुन्हेगारीने नव्याने डोकं वर काढले आहे. 1 जून ते 24 जून या 24 दिवसांत नागपुरात हत्येच्या 16 घटना घडल्या आहेत. हत्येचा प्रयत्न, लूट, दरोडा, घरफोडी सारखे गुन्हेही घडत आहेत. त्यात काल एका महिलेला रस्त्यावर पळवून तिचा जीव घेण्यात आला. त्यामुळे गृह मंत्र्यांच्या नागपुरात पोलिसांचे वचक आहे की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
Death Body found in ATM Nagpur | नागपूर शहरात इन्ड्सइंड बँकेच्या एटीएममध्ये गूढ मृत्यू