नागूपर : नागपुरात तडीपार गुंडाने शहरातील तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (22 जून) रात्री क्वॉर्टर परिसरात शाहू गार्डनजवळ गौरव खडतकर नावाच्या तरुणाची हत्या झाली. कार्तिक चौबे असं आरोपीचं नाव असून तो दोन वर्षांसाठी नागपुरातून तडीपार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रात्री उशिरा आपल्या दोन मित्रांसोबत शाहू गार्डनजवळ बसलेला होता. तिघे मित्र मद्यपान करताना त्यांचे कार्तिक चौबे नावाच्या तडीपार गुंडासोबत वाद झाले. पूर्ववैमनस्याचा राग काढत कार्तिक चौबेने त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने गौरववर हल्ला चढवला आणि दगड-लाकडी फळीने मारुन त्याला गंभीर जखमी केले. वस्तीतील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी गौरवला रुग्णालयात नेलं. मात्र, उपचाराआधीच गौरवचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य आरोपी कार्तिक चौबेला अटक केली असून तो कागदोपत्री नागपुरातून तडीपार असल्याचे मान्य केले आहे. तडीपार असून ही कार्तिक चौबे राजरोसपणे नागपुरातच कसा राहत होता याबद्दल पोलिसांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. या घटनेतील इतर आरोपी शहाबाज उर्फ बाबू आणि साहिल उर्फ राजा हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचेच असून त्यांनाही अटक करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन उघडल्यापासून नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून जून महिन्यात आतापर्यंत हत्येच्या तेरा घटना घडल्या आहेत. तर हत्येच्या प्रयत्नांच्या घटनाही मोठ्या संख्येने घडल्या आहेत. संतापजनक बाब म्हणजे ज्या गुन्हेगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळेही नागपुरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.
पॅरोलवर सुटलेल्या किंवा तडीपार केलेल्या गुन्हेगारांनी नागपुरात केलेले गंभीर गुन्हे -
1) यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत फुकटनगर परिसरात 3 जूनच्या रात्री अन्नू ठाकूर या सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी हत्या केली होती. मृत अन्नू ठाकूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.
2) पारडी परिसरातील आठवडी बाजारात बाल्या वंजारी या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. बाल्या वंजारीला पोलिसांनी नागपूर शहरातून तडीपार देखील केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो शहरात परत आला आणि पारडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच अनेकांशी वाद होऊन त्याची हत्या झाली होती.
3) अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रस्ट लेआऊटमध्ये कुख्यात गुन्हेगार सतीश चन्नेने एका तरुणीची छेड काढली आणि विरोध करणाऱ्या तिच्या भावाला गंभीर जखमी केले होते. धक्कादायक बाब म्हणजे कुख्यात सतीश चन्ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.
4) 17 जूनच्या रात्री कळमना पोलिस स्टेशनच्या हद्दीत नितेश पटले या गुंडाची प्रतिस्पर्धी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. नितेश पटले हा कोरोनामुळे तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता.
5) नागपुरातून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीने 19 जूनच्या रात्री वाठोडा परिसरात मोहित ठाकरे या तरुणाला धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते.
6) शाहू गार्डनजवळ गौरव खडतकर या तरुणाची तडीपार गुंड कार्तिक चौबेकडून हत्या