Nagpur News : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण आता काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. त्यापोठोपाठ जिल्ह्यातील सर्व 13 पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे. त्यामुळे आता पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेकांना दिग्गजांच्या आशीर्वादाची प्रतीक्षा आहे तर काहींनी आपल्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आरक्षणाची सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनल कळसकर, सामाज कल्याण सभापती नेमावली माटे, सभापती उज्वला बोढारे यांची उपस्थिती होती.
सर्वसाधारण प्रवर्गातून 7 सभापती
काटोल पंचायत समिती सभापतीपद ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी राखीव असून उमरेड ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहे. उर्वरित 7 पंचायत समित्या खुल्या (Open) प्रवर्गासाठी असून सावनेर, पारशिवनी, मौदा व रामटेक सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर भिवापूर, कामठी व हिंगणा या तीन पंचायत समिती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने जिल्ह्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आता पंचायत समिती सभापती पदाचेही आरक्षण निघाल्याने घडामोडींना वेग आले आहे.
सध्या जाहीर झालेल्या आरक्षणाची स्थिती
प्रवर्गनिहाय पंचायत समिती राखीव
नरखेड | अनुसूचित जमाती |
कळमेश्वर | अनुसूचित जमाती महिला |
काटोल | ओबीसी |
उमरेड | ओबीसी महिला |
सावनेर | सर्वसाधारण |
पारशिवनी | सर्वसाधारण |
रामटेक | सर्वसाधारण |
मौदा | सर्वसाधारण |
कामठी | सर्वसाधारण महिला |
हिंगणा | सर्वसाधारण महिला |
भिवापूर | सर्वसाधारण महिला |
नागपुर ग्रा. | अनुसूचित जाती |
कुही | अनुसूचित जाती महिला |