Nagpur News : सोशल मीडियावर चमकोगिरी करुन युवकांना कमाईचा मंत्र देणारा कथित सोशल मीडियातज्ञ अजित पारसे (Ajeet Parse) (वय 42 वर्षे) याने बडकस चौक येथील एका होमिओपॅथी डॉक्टरची तब्बल साडेचार कोटी रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणात विविध संस्थांचे सोशल मीडियाचे काम सांभाळणाऱ्या पारसे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याने पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. बडकस चौकात डॉ. राजेश मुरकुटे (वय 48 वर्षे) यांचे होमिओपॅथी क्लिनिक आहे. 2019 साली हेमंत जांभेकर यांच्या माध्यमातून मुरकुटे यांची पारसेशी ओळख झाली. डॉ. मुरकुटे यांना नवीन होमिओपॅथी कॉलेज सुरु करायचे होते. त्यासंदर्भात त्यांनी पारसेसोबत चर्चा केली. महाविद्यालय सुरु करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करावी लागेल असे पारसेने त्यांना सांगितले. त्यानंतर यश ग्लोबल ट्रेडलिंक नावाची कंपनी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.


त्या कंपनीला सीएसआरचा निधी (CSR Funds) मिळवून देतो असा दावा पारसेने केला आणि डॉ. मुरकुटे यांनी त्यांला होकार दिला. त्यानंतर त्याने पीएमओच्या (PMO) एका तथाकथिक अधिकाऱ्याशी व्हॉट्सअॅपवरच्या संवादाचे स्क्रीनशॉट्स मुरकुटे यांना पाठवले. 21 जुलै 2020 रोजी मुरकुटे यांनी 25 लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी पारसेने त्यांना विविध कामासाठी पैसे मागितले आणि डॉ. मुरकुटे (Dr Rajesh Murkute) यांनी पैसे पाठवले. डॉक्टर आर्थिक प्रकरणात हमीदार होते. याप्रकरणी सीबीआयने सुरु केलेल्या तपासाबाबत पारसे यांनी सांगितले. हा वॉरंट मागे घेण्याच्या मोबदल्यात दीड कोटी घेतले. नंतर डॉक्टरांना बनावट 'क्लोजर' रिपोर्टही पाठवण्यात आला. 


अल्पवयीन मुलीला डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतले होते. दोन दिवसांनी मुलाच्या दत्तक प्रकरणाची चौकशी सुरु होईल, असे पारसेने सांगितले. डॉ. मुरकुटे यांच्या तक्रारीनुसार त्यातदेखील पारसेने पैशांची मागणी केली. डॉ. मुरकुटे यांनी या कालावधीत एकूण साडेचार कोटी रुपये दिले. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडेही केली. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पथकाने गुन्हा नोंदविला आहे.


कागदपत्रांची वैधताही तपासली नाही?


या प्रकरणात डॉ. मुरकुटे विविध कारणांसाठी पारसेला दर वेळी पैसे देत गेले. मात्र, त्यांनी मिळालेली कागदपत्रे, दस्तावेज, वॉरंट इत्यादींची स्वतः चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. याशिवाय सीएसआर फंड, महाविद्यालय स्थापनेच्या इतर प्रक्रियेचीदेखील चाचपणी केली नाही. उच्चशिक्षित असूनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका त्यांना बसला आहे.


डॉक्टरांसह, अधिकाऱ्यांचा 'हनीट्रॅप'?


अजित पारसे हा गेल्या काही वर्षात शहरात मोठे प्रस्थ झाला होता. त्यातून त्याने दिल्लीमध्ये आपली ओळख निर्माण केली. यामाध्यमातून त्याने शहरातील नामांकित डॉक्टरांसह बड्या शासकीय अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमधअये अडकवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या माध्यमातून त्याने 18 ते 20 कोटी रुपयेही उकळल्याचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे शासकीय कामे करुन देण्याच्या बहाण्याने तो काहींना दिल्लीला न्यायचा. त्यानंतर एका बड्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करुन त्यांच्या खोलीत तरुणींना पाठवून त्यांचे अश्लील छायाचित्र काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैसे वसूल करायचा. अशा 8 ते 10 जणांकडून त्याने पैसे उकळल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.


आजारी पारसे दवाखान्यात दाखल


पारसेच्या घराची तपासणी केली असता तेथे काही मंत्री, पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नावाचे लेटरहेड तसंच स्टॅम्पपेपर सापडले. काही दिवसांपासून पारसे आजारी असल्याने दवाखान्यात दाखल आहे. त्यामुळे पोलिसांनी पारसेची चौकशी केलेली नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या


कधीच न घडलेल्या खुनाचा स्टॅम्प पेपरवर लिहिलेला कथित कबुली जबाब उघड करण्याची धमकी, दाम्पत्याने महिलेकडून 15 लाख रुपये उकळले