Vijay Barse: रील लाईफ आणि रियल लाईफ वेगवेगळी असते. रियल लाईफमध्ये त्याचा प्रत्यय विजय बारसेना येतो आहे. नागपूरचे क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांचा जीवनपट रील लाईफमध्ये खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी साकारला. नागनाथ मंजुळे यांनी  'झुंड' चित्रपटाच्या माध्यमातून तो जगासमोर आणला. मात्र, तेच विजय बारसे आज वेगळ्या अडचणीत आहेत. झोपडपट्टीतील मुलांना चांगलं वळण लागावं, तसेच त्यांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी गेल्या 21 वर्षापासून फूटबॉलचे प्रशिक्षण देत आहेत. दरवर्षी विजय बारसे स्लम सॉकर अशी फुटबाल स्पर्धा भरवतात. मात्र, यावर्षी त्यांना या स्पर्धेसाठी एकही प्रायोजक मिळत नाही. त्यामुळे या वर्षीची फुटबॉल स्पर्धा कशी घ्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.


झोपडपट्टीत राहून शिक्षणापासून दुरावलेल्या आणि अवतीभवतीच्या वातावरणामुळे अमली पदार्थांची सवय लागलेल्या, गुन्हेगारीत गुरफटलेल्या मुलांना चांगले वळण लागावे, त्यांच्या जीवनाला उद्दिष्ट मिळावे. यासाठी नागपूरचे क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल चे प्रशिक्षण देणे सुरु केले होते. त्यांनी 2001 पासून त्यांच्यासाठी स्लॅम सॉकर ही स्पर्धा ही सुरु केली.  हळू हळू हीच स्पर्धा राज्यात आणि देशात अनेक शहरांपर्यंत पसरली. वर्ष 2022 साठीची स्पर्धा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजित आहे. या स्पर्धेसाठीचा ठिकाण अद्याप निश्चित नसला, तरी पिंपरी चिंचवडमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, कोणताही प्रायोजक मिळालेला नाही. काही कंपन्यांनी प्राथमिक बोलणी केली असली, तरी अंतिम शब्द  कोणीही दिलेला नाही. त्यामुळे झुंड चित्रपटाने स्वस्थ मनोरंजन केला असला तरी झोपडपट्टीतील मुलांसाठी स्वस्थ प्रायोजक मिळत नसल्याची खंत विजय बारसे यांनी बोलून दाखविली.


"स्लम सॉकर स्पर्धेमध्ये सुमारे 600 पुरुष आणि महिला सहभागी होतात. सोबतच स्पर्धा घेण्यासाठी किमान 50 जणांची टीम लागते. त्या सर्वांचा येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा व  खाण्याचा खर्च मिळून एक कोटींचा खर्च लागतो. कोटी तरी कंपनी नक्कीच समोर येईल आणि स्पर्धेला प्रायोजक मिळेल असा विश्वास विजय बारसे यांना आहे. प्रायोजक मिळाला नाही तर स्वखर्चाने स्पर्धा मे महिन्यातच घ्यावी लागेल. कारण त्याच स्पर्धेतून भारताची एक टीम निवडून सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क मध्ये होणाऱ्या जगातील स्लम सॉकर स्पर्धेसाठी टीम पाठवावी लागणार आहे. स्लम सॉकर स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक तरुणांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असते. त्यामुळे त्यांना परदेशात पाठवायचे असल्यास पासपोर्ट काढण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे वेळेत सर्व काही करणे ही गरजेचे आहे", असे विजय बारसे यांचे म्हणणे आहे. 


 दरम्यान, या मुद्द्यावर झुंड चित्रपट बनवणाऱ्या नागराज मंजुळे यांना ही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी हा विषय फारसा माहीत नाही. मात्र, झोपडपट्टीतील मुलांसाठी होणाऱ्या स्पर्धेला मदत करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तीन तासांचा झुंड चित्रपट अनेकांनी पाहिला. चित्रपट प्रदर्शित होतानाच्या काळात त्यांच्या अवतीभवती प्रसिद्धीचा झगमगाट राहीला. चित्रपट गृहातून बाहेर येऊन काही वेळ सर्वानी विजय बारसे यांच्या कार्याची स्तुती ही केली. मात्र, झोपडपट्टीतील हजारो नव्हे तर लाखो मुलांच्या जीवनात फुटबाल या क्रीडाप्रकाराने सकारात्मकतेचा ज्योत पेटवणारे विजय बारसे पुन्हा एकदा एकटे पडले आहेत. आणि पुन्हा त्याच त्वेषाने आणि विश्वासाने स्लम सॉकर स्पर्धा भावून भारतातील झोपडपट्टीतील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंना निवडून अमेरिकेतील मुख्य स्पर्धेसाठी नेण्यासाठी कामाला लागले आहे.


हे देखील वाचा-