नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सीताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे, हर घर तिरंगा, बुस्टर लसिकरण भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, महामेट्रो आणि रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महामेट्रो नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरणचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणेचे उपसंचालक निखील देशमुख, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन राय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक संचालक हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रदर्शनात सन 1700 पासून ते 1947 पर्यंतचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास, स्वाातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरूषांची माहिती, स्वातंत्र्यानंतरचा भारत एकसंघ करण्यासाठी केलेले प्रयत्न, भारताचा संविधान, स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख स्थाळे यांची माहिती प्रदर्शती करण्यात आली आहे. सोबतच स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे भव्य छायाचित्रांचाही समावेश आहे. यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध कामांची माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शन 16 ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. तसेच सर्वांसाठी निशुल्क आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सदर छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख, सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या नेतृत्वात तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजिवनी निमखेडकर, नरेश गच्छकाय, संतोष यादव यांनी परीश्रम घेतले.
पोलिस आयुक्तांचीही उपस्थिती
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी छायाचित्र प्रदर्शन स्थळाला भेट देऊन पाहणी केली. नागरीकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन भावी पिढीच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने केलेल्या 8 वर्षाच्या विकास कामांची माहिती सांगणारे मल्टीमीडिया प्रदर्शनाचाही यात समावेश आहे. केवळ बोटाच्या एका क्लिकद्वारे मागील आठ वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती नागरीकांना मिळत आहे.
देशभक्ती गीताने नागरीक मंत्रमुग्ध
केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे येथील गीत व नाटक विभागाने विविध देशभक्ती गीत सादर करून उपस्थित नागरीकांना मंत्रमुग्ध केले. गीत व नाटक विभागाचे व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील यांच्या नेतृत्वात गायक मकरंद मसराम, उपाधि सिंग, कुमुद ककोनिया, डॉ. ममता मसराम, मंदार गुप्ते, गौतमी गोसावी, प्रकाश वाकडे यांच्यासह इतर चमूने हे गीत सादर केले.
Devendra Fadnavis : नागपूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यसरकार कटीबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
जिल्हा परिषदेच्या माहिती पत्रकाचे वितरण
केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 16 ऑगस्ट 2022 दरम्यान हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे छायाचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरीकांना वितरण करण्यात आले. या माहिती पत्रकात नागरीकांना तिरंगा ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या माहितीचा समावेश आहे.