नागपूर : नव्या नागपूरच्या सुनियोजित विकासासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. राज्य शासनातर्फे विकासासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच गुंठेवारी योजना राबवून शहराचा विकासाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर सुधार प्रन्यासतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील 75 शूर वीरांची माहिती असलेल्या 'स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे' या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
संघर्षाची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवा
एनएमआरडीए सभागृहात आयोजित कार्यक्रमात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती तथा महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, विश्वस्त संदीप इटकेलवार, माहिती संचालक हेमराज बागुल तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानातून देश स्वतंत्र झाला. त्यांच्या संघर्षाची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी अमृत काल ही संकल्पना राबविण्याची सूचना करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरातील विविध खेळांच्या मैदानांवर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची गाथा फलकांच्या माध्यमातून लावताना जिल्ह्यातील क्रांतिवीर स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा जीवनपट जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावा. नागपूर सुधार प्रन्यासने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे' ही संकल्पना अभिनव पद्धतीने राबविली आहे.
अविकसित भागाचा नियोजनबद्ध विकास करा
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या अविकसित भागाचा नियोजनबद्ध विकास करताना जनतेला जबाबदार न धरता या संस्थेने विकासाची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना करताना गुंठेवारीची योजना राबवून या संपूर्ण परिसराचा सुनियोजित विकास कसा होईल, यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वांसाठी घरे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील नागरिकांना परवडेल असे घर उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना यावेळी फडणवीस यांनी केली.
नागरिक अन् पोलिसांमधील संवाद वाढविण्यासाठी माहितीचे प्रदर्शन आवश्यक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी घरकुल
देशात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी घरकुल ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून तृतीयपंथीयांनाही हक्काचा निवारा देणारे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासोबतच फुटाळा येथे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व संगीतमय कारंजे, अंबाझरी येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर लाईट अँड साऊंड शो, खेलो इंडिया अंतर्गत पाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांच्या मैदानांचा विकास आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे' या पुस्तिकेचे लेखन व संपादन निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी व अनिल गडेकर यांनी केले आहे. यामध्ये नागपूर व विदर्भातील स्वातंत्र्य लढ्यात सहभाग दिलेल्या स्वातंत्र्य विरांसोबतच देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीविरांचा त्याग व बलिदानाच्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 7 लाख 66 हजार घरांवर डौलाने फडकतोय तिरंगा
शरद चौधरी व अनिल गडेकर यांचा सत्कार
या पुस्तिकेच्या निर्मितीसाठी निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी व माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला. प्रारंभी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती तथा महानगर आयुक्त सूर्यवंशी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे' या सचित्र माहिती पुस्तिकेसोबतच नागपूर शहरातील विविध उद्यानांमध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिविरांची माहिती युवा पिढीला व्हावी, यासाठी फलकांच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आजपासून झाला. नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर विकास प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले, नगर रचना उपसंचालक राजेंद्र लांडे यांनी आभार मानले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजाने, संजय पोहेकर, कार्यकारी अधिकारी अनिल पातोडे, पंकज आंभोरकर, ललित राऊत, कल्पना लिखार, वैशाली गोडबोले, लेखा व वित्त अधिकारी खडसे, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.