नागपूर : भारत बायोटेक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि आयसीएमआर या तीन संस्थांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या "कोवॅक्सीन"ची मानवी चाचणी आता निर्णायक टप्यात पोहोचली आहे. लवकरच या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे देश पातळीवरील निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डिसीजीआयच्या परवानगीनंतर कोवॅक्सीनच्या आणखी विस्तारित चाचण्यांना सुरुवात होणार आहे.


कोवॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी जुलै महिन्यात देशभरात 12 ठिकाणी सुरु झाली होती. नागपुरातही गिल्लूकर मल्टी स्पेशियालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून 55 स्वयंसेवकांची निवड करत त्यांना पहिल्यांदा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आणि त्यांनतर दुसऱ्यांदा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्येकी 14 - 14 दिवसांच्या अंतरावर दोन वेळेला कोवॅक्सीन लावण्यात आली होती. लस लावल्यानंतर त्यांच्या शारीरिक लक्षणांवर डॉक्टर्सनी बारीक नजर ठेवली होती. दोन्ही वेळेला लस लावल्यानंतर पुढील 14 दिवसात या 55 स्वयंसेवकांना कोणतेही शारीरिक त्रास झाले नाहीत. त्यामुळे कोवॅक्सीन एक सुरक्षित लस आहे हे जवळपास सिद्ध झालेच आहे. मात्र, आता कोवॅक्सीन लावलेल्या स्वयंसेवकांमध्ये डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांना अपेक्षित असलेल्या अँटीबॉडीज किती प्रमाणात वाढल्या आहेत हे तपासण्याची वेळ आली आहे.


जुलैच्या अखेरच्या आठवड्यात स्वयंसेवकांना पहिल्यांदा लस लावल्याच्या 14 दिवसानंतर सर्व स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते दिल्लीच्या केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले गेले होते. आता लसीच्या दुसऱ्या डोजनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सर्व 55 स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने पुन्हा घेऊन दिल्लीला पाठवले जाणार आहे. आजपासून पुढील दोन दिवस रक्ताचे नमुने गोळा करण्याची ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर दिल्लीच्या केंद्रीय प्रयोगशाळेत कोवॅक्सीनच्या पहिल्या डोजच्या 14 दिवसानंतरचे रक्ताचे नमुने आणि कोवॅक्सीनच्या दुसऱ्या डोजच्या 14 दिवसानंतरच्या नमुन्यांची तुलना करत त्यामध्ये अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्या हे पाहिले जाणार आहे. पहिल्या डोज नंतर अँटीबॉडीज निर्माण होण्याचे प्रमाण आणि दुसऱ्या डोजनंतर त्यात किती प्रमाणात वाढ झाली, ही तुलना कोवॅक्सीनच्या यशासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कोवॅक्सीन आता महत्वाच्या आणि निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे, असे म्हंटले जात आहे. याच्यातूनच कोवॅक्सीनची कोरोना विषाणूसंदर्भातली परिणामकारकता स्पष्ट होणार आहे.


केंद्रीय प्रयोगशाळेत कोवॅक्सीनच्या चाचण्यांसाठी निवडलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या रक्ताची चाचणी झाल्यानंतर त्यासंदर्भातला अंतिम निष्कर्ष भारत बायोटेक आणि आयसीएमआर कडून जाहीर केला जाणार आहे. तो सकारात्मक आल्यावर कोवॅक्सीनच्या आणखी व्यापक म्हणजेच आताच्या तुलनेत आठ ते दहा पटीने जास्त प्रमाणात मानवी चाचण्यांना सुरुवात होणार आहे. मात्र, त्या विस्तारित मानवी चाचण्यांच्या आधी पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोवॅक्सीन लस सुरक्षितता (safety), प्रतिक्रिया (reactivity), सहनशीलता (tolerability) आणि रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे (immunogenicity) या चार निकषांवर कितपत यशस्वी ठरली याचे सर्व आकडे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ
इंडिया म्हणजेच डीसीजीआय यांना सादर केले जाणार आहे... त्यानंतर डीसीजीआय कोवॅक्सीनच्या विस्तारित चाचण्यांना परवानगी देणार आहे.


दरम्यान, सध्या तरी कोवॅक्सीन चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या मार्गावर असून पहिल्या टप्प्यातील आतापर्यंतचे निकाल उत्साह वाढविणारे आहे.


महत्त्वाच्या बातम्या :