नागपूर : नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने (Government Dental College Nagpur) केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदर्भाच्या (Vidarbha) आदिवासी बाहुल भागातील 15 टक्के आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मुखपूर्व कर्करोगाचे (Cancer) लक्षणे आढळले आहेत. हे विद्यार्थी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील असून 7 ते 21 वयोगटातील शाळा, महाविद्यालय आणि आश्रम शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत.


मुखपूर्व कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण गडचिरोलीत


महत्त्वाचे म्हणजे 23 हजार 80 विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 52 टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याचेही दिसून आले. मुखपूर्व कर्करोगाचे सर्वाधिक 19 टक्के प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये आढळले. या सर्वक्षणानंतर एकच खळबळ उडाली असून यावर उपाययोजना म्हणून प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 


'या' कारणांमुळे व्यसनाचे प्रमाण वाढलं


सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ, जाहिरातींचा प्रभाव आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन मध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी असूनही ते दुकानात सर्रास विकले जात आहेत. त्यामुळे खर्रा, तंबाखू, गुटखा सहज उपलब्ध होतो. विशेषत: विद्यार्थी आणि महिला या विषारी पदार्थाच्या व्यसनात अडकले आहेत. या व्यसनांपासून दूर राहावे याकरता तंबाखूचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी जागृती केली जात आहे. मात्र सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. उलट यामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.


मुखाचा कर्करोग हा गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. क्वचितच अपवाद वगळता मुखाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हेच आहे.


डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक उपकरणाची सोय 


दरम्यान, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुख पूर्वकर्करोगाचे वेळीच निदान व उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणाची सोय उभी केली आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) याचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुपारी रुग्णालयाला भेट देत 'टोबॅको सीजेशन सेंटर', 'सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर ओरल प्रिकॅन्सरस कॅन्सर' तसंच 'सेंटर ऑफ एक्सेलेंस फॉर रिजनरेटिव्ह पेरिओडांटोलॉजी'चे उद्घाटन केले. तंबाखुच्या वाढत्या व्यसानामुळे मुखाचे आजार वाढत आहेत. मुखाचा आजाराचे वेळीच निदानासाठी प्रत्येक गावात डेंटिस्टची गरज आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी स्वदेशी उपकरणाचा निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले होते.


हेही वाचा


Oral Cancer: 'अशी' असतात तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; ठरू शकतो घातक