Tadoba Jungle Safari Bookings Scam : ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba-Andhari Tiger Reserve) जंगल सफारीची (Jungle Safari) ऑनलाईन बुकिंग (Online Booking) बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टी काळातील बुकिंगवर परिणाम झाला आहे. सफारी बुकिंग बंद असल्याने रिसॉर्ट बुकिंग, जिप्सी बुकिंग, टॅक्सी बुकिंग सर्वच ठप्प पडली आहे.
वाद न्यायालयात, तोडगा निघेपर्यंत सफारी बुकिंग बंद ठेण्याचे आदेश
ऑनलाईन बुकिंगची जबाबदारी असलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीवर 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वन विभागाने केला आहे. त्यासंदर्भात वन विभागाने बुकिंग कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र ऑनलाईन तिकीट बुकिंग कंत्राटच्या अटी आणि त्यातील बुकिंगचा अधिकार हा वाद न्यायालय गेला आहे. त्यामुळे त्यावर तोडगा निघेपर्यंत तरी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग बंद ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, जंगल सफारीची बुकिंग कधीपर्यंत बंद असेल हे निश्चित नसल्याने बुकिंगचा पर्यायी मार्ग सुरु करावा अशी मागणी पुढे येत आहे.
एजन्सीकडून 12 कोटी 15 लाख रुपयांचा गंडा
चंद्रपूरच्या प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करणारी एजन्सी म्हणून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनकडे जबाबदारी होती. जंगल सफारी बुकिंग करणाऱ्या याच एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. करारनाम्यानुसार गेल्या 3 वर्षात एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. वारंवार पाठपुरावा करुनही उर्वरित रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. या एजन्सीने पैसे थकवल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पेमेंटला उशीर झाला होता आणि तेव्हाच या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती.
हेही वाचा