नागपूर : आधी ठाकरे गटातील महिला नेत्यांवर आरोप करत त्यांची साथ सोडणाऱ्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेचाही राजीनामा दिला आहे. मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेची पुन्हा आमदारकी दिल्याने नाराज झालेल्या शिल्पा बोडखे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. प्रा. शिल्पा बोडखे या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख होत्या. 


पक्षातील वाचाळविरांना कंटाळून आपण राजीनामा देत आहोत असं प्रा. शिल्पा बोडखे यांनी स्पष्ट केलं. हे वाचाळवीर दुसऱ्यांवर टीका करतात, आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवलं आहे का असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. प्रा. शिल्पा बोडखे यांनी शिंदेंना एक खरमरीत पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्यामागे नाराजीचं कारण असून मनीषा कायंदे यांचे नेतृत्व मान्य नसल्याने त्यांनी पक्षातून राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. 


प्रा. शिल्पा बोडखे यांनी सहा महिन्यांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यावेळी विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्यावर आरोप करून त्यांनी ठाकरेंची शिवेसना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. पण आता मनिषा कायंदे यांचे नेतृत्व मान्य नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेचाही त्यांनी राजीनामा दिला. 






काय म्हटलंय पत्रात? 


प्रा. शिल्पा बोडखे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मुख्यमंत्री राज्यात मोठा विकास करत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण काम करत आहोत. पण पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुसऱ्यावर टीका करतात. त्यामुळे कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होऊन कुणाच्या भावना दुखावू शकतात. आपल्या हिंदुत्वात दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवला आहे का? मी देखील हिंदू आहे आणि आपल्याला दुसऱ्याचा आदर करायला शिकवलं आहे. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद असून नयेत. वाचाळविरांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या कामाला कुठेतरी तडा जात आहे. त्यांना आवर घालण्यापेक्षा त्यांचे शब्द जिलेबीसारखे फिरवले जातात. अशा वातावरणात आपण काम करू शकत नाही. म्हणून राजीनामा देत आहे. 


ही बातमी वाचा: