Nagpur News Updates : शिवशाही बसेसमध्ये (MSRTC Shiv shahi) प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसूल करून प्रवाशांना विविध सवलतींच्या नावाखाली शून्य पैशांचे तिकीट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आता एसटी महामंडळाने चौकशी सुरु केली आहे. मुख्यत: गणेशपेठ बसस्थानकावरुन नागपूर भंडारा मार्गावर एसटीच्या नॉन स्टॉप शिवशाही धावते. या शिवशाही बसेसच्या बुकिंगचे कंत्राट ट्रायमॅक्स कंपनीला देण्यात आले आहे. यात स्थानिक एजंटने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे एसटीच्या तपासणी पथकाला दिसून आले.
स्पॉट बुकिंगचे कंत्राट
नागपूर-भंडारा मार्गावर एसटी महामंडळाच्या नॉन स्टॉप शिवशाही बसेस धावतात. एकदा गणेशपेठ येथून सुटलेली शिवशाही थेट भंडारा येथे थांबते. एसटी महामंडळाने यासाठी ट्रायमॅक्स कंपनीला स्पॉट बुकिंगचे कंत्राट दिले आहे. मात्र कंपनीच्या एजंटने स्पॉट बुकिंगच्या नावाखाली अफरातफर सुरू केली. गणेशपेठ येथून शिवशाही निघाल्यानंतर जगनाडे चौक, एचबी टाऊन येथे थांबवून प्रवाशांना घेतल्या जात होते. प्रवाशांकडून संपूर्ण प्रवासभाडे घेतल्यानंतर विविध सवलतींचे शून्य पैशांचे तिकीट दिले जात होते.
4 प्रवाशांना शून्य पैशांचे तिकीट
एसटी महामंडळाच्या भंडारा विभागातील मार्ग तपासणी पथकाने 26 सप्टेंबर रोजी नागपूर-भंडारा शिवशाही बस तपासली. त्यावेळी 4 प्रवाशांना शून्य पैशांचे तिकीट देण्यात आल्याचे पथकाला दिसून आले. विविध सवलतींचे शून्य पैशांचे तिकीट देण्याचा हा प्रकार गत अनेक वर्षांपासून सुरु असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे एसटीला लाखो रुपयांचा चुना लागला आहे.
महामंडळाकडून चौकशी सुरू
एसटी महामंडळात लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आता एसटी महामंडळाकडून चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर कितींचा घोटाळा झाला आदींबाबत माहिती मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या