Nagpur News Update :    शिस्तबद्ध पद्धतीने आणि कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर करवाई करणारे आणि कोणताही राजकीय पक्ष असो दबाव आणल्यास त्यांना नियमांचा पाढा शिकवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची ओळख. ते राजकीय पक्षांना आवडत नसले तरी जनतेमध्ये त्यांची क्रेझ वेगळीच. नागपुरातील त्यांची कारकीर्द चांगलीच वादळी आणि तेवढीच वादग्रस्त राहिली होता. तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईच्या भूमिकेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाष्य केलं आहे. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॉर्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी."


दरम्यान तुकाराम मुंढे आता आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक झाले आहेत. त्यामुळे या विभागात आता अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीचे सत्र सुरु होणार, असे बोलले जात आहे.


आधी वॉर्निंग द्या, थेट कठोर कारवाई नको


यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारणा केली असता, आरोग्य विभागात अकाऊंटीबिलिटी गरजेची आहे. सरकार बदललंय अकाऊंटीबिलिटी ठरली पाहिजे. प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक आहे. मेयो हॉस्पिटलमध्ये (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय) (IGMC) शिबिराला भेट देण्याकरता फडणवीस आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 


आज 500 लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन


मागील काळात आमच्या सरकारमध्ये मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र (Cataract Free Maharashtra) अभियान राबवत 17 लाख ॲापरेशन केले होते. आता पुन्हा एकदा आम्ही मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र हे कॅम्पेन सुरु केलं आहे. माझ्या नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच 4000 लोकांची चाचणी केली होती, त्यांपैकी 500 लोकांचे ॲापरेशन आज करणार आहोत. सगळ्या मतदारसंघांत अशाप्रकारे कॅम्प घेण्यात येणार आहेत आणि तेथील लोकांना या आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत, असे फडणवीसांनी सांगितले. 


ज्यांना घोटाळे करण्याची सवय, ते असे बोलणारच


आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सध्या वाद सुरु आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विचारले असता, आदिपुरुष या चित्रपटाबद्दल मी आता काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. राज्यातील रेशन कार्ड (पिवळे) धारकांना 100 रुपयांत धान्य, तेल आदी साहित्याची किट (Ration Kit) देण्यात येणार आहे. याच्या निविदेमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक करीत आहेत, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ज्या कुणा शंका आहे, त्यांनी फुड कीट निविदा प्रक्रिया तपासून घ्यावी, ओपन टेंडर पद्धतीनं एनसीडीएक्सच्या माध्यमातून स्पर्धेतून प्रक्रिया केली आहे. कोणाचीही तपासाला हरकत नाही. पण ज्यांना घोटाळे करायची सवय आहे, तेच असे आरोप करतात.  


मेयो, मेडिकलमध्ये सुविधा वाढवण्यावर भर


मेयो रुग्णालय परिसरात असलेली मेडिकल बिल्डिंग नवीन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच नवे होस्टेल बांधण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) जी गरजेची कामे आहेत, ती आता प्राथमिकतेने करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Devendra Fadnavis : शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची पद्धत बंद करा, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावले


Pune Shinde-Thackeray Marriage : काय सांगता? 'ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात'; जुन्नरमधील लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल