Nagpur Crime News : लग्न करतो म्हणून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका ठगाला सीताबर्डी (Sitabuldi Police Station) पोलिसांनी अटक केली आहे. भिकन नामदेव माळी (42) रा. देविदास कॉलनी, सुभाषनगर, धुळे (Dhule) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एका 34 वर्षीय पीडितेने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. भिकनला जुगार आणि सट्ट्याचे व्यसन आहे. पैशांसाठी तो मॅट्रिमोनियल साईटवर (Matrimony Site) महिलांशी ओळख वाढवायचा. वेगवेगळी कारण सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि फरार व्हायचा, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
75 हजार रुपये पगार असल्याची थाप
तक्रारीनुसार, जूनमध्ये भिकनने सीताबर्डी परिसरात राहणाऱ्या पीडितेला शादी डॉट कॉम नावाच्या मॅट्रिमोनियल साइटवरून लग्नाचा प्रस्ताव पाठवला. यावेळी त्याने त्याचे नाव मोहित राजाराम पवार आणि वय 37 वर्षे सांगितले होते. तसेच तो मुंबईत टाटा मोटर्स कंपनीसाठी काम करीत असून त्याला 75 हजार रुपये महिना पगार असल्याची थाप मारली. चांगले स्थळ आल्याने पीडितेने त्याच्याशी बोलचाल सुरू केली. भिकन पीडितेला भेटण्यासाठी नागपूरला आला. त्याने पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अविवाहित असल्याचे सांगून वडील पोलिस विभागातून सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती दिली.
सामाजिक कार्यासाठी 20 हजारांची मागणी
काही दिवसानंतर भिकनने पीडितेला सांगितले की, सामाजिक कार्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता आहे. पीडितेने त्याला 20 हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर भिकनने तिच्याशी बोलणं बंद केली. मुंबईला परतण्यासाठी पीडितेनेच त्याचे तिकीट बुक केले होते. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीला आधीच माहिती देण्यात आली होती की, असा कोणता व्यक्ती तिकीट बुक करण्यासाठी आला तर माहिती देण्यात यावी. दोन दिवसांपूर्वी भिकनने त्याच ट्रॅव्हल्स कंपनीत तिकीट बुक केल्याची माहिती पीडितेला मिळाली. ती भिकनला जाब विचारण्यासाठी तेथे पोहोचली. यावेळी तिला भिकनसोबत एक तरुणीही दिसली. विचारपूस केली असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने पीडितेने त्याला पकडले.
पंधरा महिलांची केली आहे फसवणूक
सीताबर्डी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीत भिकनला जुगार, सट्ट्याचे व्यसन आहे. तो अशाच प्रकारे महिलांची फसवणूक करून पैसे घेतो आणि ते जुगारात उडवतो. तसेच भिकन विवाहित आहे आणि पत्नी व मुलांपासून वेगळा राहतो. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करतो. वेगवेगळ्या बहाण्याने त्यांना जाळ्यात अडकवून पैसे उकळतो. आतापर्यंत त्याने 15 महिलांना चुना लावला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मॅट्रिमोनियल साईटवर संपूर्ण चौकशी आणि विचारपूस केल्यानंतरच लोकांशी संपर्क वाढवावा. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक टाळा.
इतर महत्त्वाच्या बातम्या