Nagpur News : आगामी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकांच्या तयारीला वेग आले आहे.  एक आक्टोंबरपासून मतदार नोंदणी प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फॉर्म 19 भरून नोंदणी केली जात आहे. शिक्षक मतदार संघाकरिता विभागीय आयुक्त, मतदार नोंदणी अधिकारी (Registration Officer) व जिल्हाधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. आतापर्यंत एक हजार 918 अर्ज जमा झाले असल्याची माहिती आहे.


शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी पात्र व्यक्तीने दावा अर्ज नमूना-19 मध्ये रंगीत छायाचित्र, रहिवासी दाखला, अध्यक्षांच्या प्रमाणपत्रासह अर्ज भरणे आवश्यक आहे. संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक पात्र शिक्षकांना ऑफलाईन पध्दतीने नमूना-19 मध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक ऑक्टोबर 2022 पासून तर 9 डिसेंबर 2022 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमूना 19 भरणे अनिवार्य आहे.


शहरी भागातील शिक्षक मतदार संघाचे मतदारांनी त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडे जमा करता येणार आहे. तसेच 7 नोव्हेंबरपर्यंत पात्र शिक्षक मतदारांना नमूना 19 सहाय्यक नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी, सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहे.  सर्व पात्र शिक्षकांनी लवकरात लवकर मतदार यादीत नावे नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.


कोण करू शकतो मतदान?


नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये एक नोव्हेंबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2022 या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिलेला शिक्षकच यासाठी पात्र मतदार आहे. त्यासाठी शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म 19 भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते. यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करता येईल असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


इतर महत्त्वाची बातमी


Raj Thackerays Letter to Maharashtra CM : ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्या; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र