Nagpur News : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या (AAP) वाढत्या जनसमर्थनाला घाबरुन केंद्र सरकार सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणांचा वापर करुन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आरोप करत शेकडो कार्यकर्ते रेशीमबाग चौकात एकत्र आले. सुरेश भट सभागृह येथे आयोजित विदर्भस्तरीय राष्ट्रनिर्माण संकल्प सभेनंतर कार्यकर्ते रेशीमबाग चौकात जमा झाले होते.यावेळी पाऊस पडत असतानाही आंदोलनात सहभागी कार्यकर्ते मागे हटले नाही.
देशभरात लोकशाहीची गळचेपी करण्याचे कृत्य भाजपच्यावतीने (BJP) करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांचा पूर्णपणे दुरुपयोग सुरु आहे. याशिवाय आपची वाढत्या लोकप्रियतेमुळे नेत्यांना मुद्दाम अटक करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी रंगा राचुरे यांनी केला. सतत होणाऱ्या या कारवायांविरोधात आता आम आदमी पार्टी शांत न बसता रस्त्यावर उतरून भाजप विरोधात मोठी लढाई लढणार हे असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
सिंह यांना दिल्लीत अटक!
या सभेला आज आपचे राष्ट्रीय नेते खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र दिल्लीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडीमुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. त्याचा निषेध म्हणून सभा आटोपती घेतली आणि लगेच रंगा राचुरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सुरेश भट सभागृहातून 'हल्ला बोल' चे नारे देत रेशीमबाग (Reshimbag Nagpur) चौकाकडे सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह मोर्चा वळवून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनापूर्वी आम आदमी पार्टी विदर्भस्तरीय राष्ट्र निर्माण संकल्प सभा झाली. या सभेत पूर्ण विदर्भातून मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सभेला प्रामुख्याने माजी खासदार राज्य सह संयोजक हरिभाऊ राठोड यांनी मार्गदर्शन केले.
आगामी नागपूर मनपा निवडणूकीसाठीही पक्ष सज्ज: वानखेडे
यावेळी विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी आम आदमी पार्टीची विदर्भातल्या सर्व महानगरपालिका, नगर पालिका व नगरपंचायत निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. तसेच आगामी नागपूर महानगरपालिकेसाठी विविध प्रभागात कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांकडूनही आपच्या कार्यकर्त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या