Raj Thackerays Letter to Maharashtra CM : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची विनंती केली आहे. "ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा," असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.






 


पत्रात काय लिहिलंय?


प्रति,
सन्मा. श्री. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
सस्नेह जय महाराष्ट्र !
महोदय,
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे.  ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. 
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा. 
दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती.
आपला नम्र 
राज ठाकरे


युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश 
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आलं आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात विशेष लक्ष घालावं. पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना  सराकारतर्फे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.