नागपूर : 'सगेसोऱ्यांसंदर्भात निर्णय घेणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. आपली पितृसत्ताक संस्कृती आहे, त्यामुळे मुलाला वडिलांची जात लागते आईची नाही', अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी दिली आहे. तसेच ज्या मागण्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केल्या आहेत, ते सगळे जुनेच नियम आहेत. कारण 12 वी पर्यंत मुलींना शिक्षण मोफतच आहे, तसेच पुढच्या शिक्षणासाठी देखील मदत मिळते, असं देखील बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. 


मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं अशी मागणी केलीये. त्याच पार्श्वभूमीवर आज किंवा उद्या दुपारी 12 पर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी सरकारला केली. तसेच आता सरकार देखील मनोज जरांगे यांच्या मागणीवर सकारात्मक असून हा अध्यादेश आजच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकार मान्य करुन अध्यादेश कधीपर्यंत काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


 जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचे कारण काय? बबनराव तायवाडेंचा सवाल


जरांगे म्हणतात 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यांच्याकडे यासंदर्भातली यादी देखील आहे. तसेच आम्ही देखील या यादीच्या प्रतीक्षेत आहोत. माझ्या मते ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी 99 टक्के जुन्याच नोंदी आहेत. जर 37 लाख लोकांना प्रमापत्र मिळाले असतील, तर आरक्षण मिळालं आहे. मग नोकर भरती स्थगित ठेऊन जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचे कारण काय? असा सवाल बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केलाय. तसेच या रिक्त जागा का ठेवायतच्या हे स्पष्टीकरण मनोज जरांगे यांनी द्यावं, असंही बबनराव तायवाडे म्हणालेत. 


जोपर्यंत सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शिक्षण मोफत देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच शासन भरतीमध्ये मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेवण्याची मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली. त्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिलीये. तसेच मनोज जरांगे यांच्या काही मागण्या होत्या, त्या मान्य झाल्याचं चित्र सध्या आहे, त्यामुळे रात्रभरात हे आंदोलन संपेल अशी अपेक्षा देखील बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलीये. 


मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 



  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या 

  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा 

  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा 

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या 

  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही


हेही वाचा : 


Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर आजच अध्यादेश निघण्याची शक्यता, सरकारही सकारात्मक