मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला केलेल्या मागण्यांचा आजच अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आलीये. तसेच हा अध्यादेश आजच निघण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सचिव आणि समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता हा अध्यादेश आजच किंवा फारफारतर सकाळपर्यंत निघण्याची शक्यता आहे.
आज किंवा उद्या दुपारी 12 पर्यंत मराठा समाजाच्या मान्य केलेल्या मागण्यांचा अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. त्याचप्रमाणे जर हा अध्यादेश काढला नाही तर उपोषणासाठी आझाद मैदानावर धडक देणार असल्याची घोषणा केलीये. तसेच जर हा अध्यादेश आज काढला तर गुलाल उधळायला आम्ही आझाद मैदानावर जाऊ, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. पण जोपर्यंत अध्यादेश निघणार नाही, तोपर्यंत माघारी फिरणार नाही, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केलीये.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?
- नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या
- शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या
- कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा
- जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
- आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
- आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या
- SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या
- वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या
- रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही
काय म्हणाले मनोज जरांगे?
शासनाच्या वतीनं चर्चा झाली. शासनाला आपण ज्या मागण्या केल्या होत्या, आणि ज्यासाठी आम्ही मुंबईत आलो होतो त्यावर चर्चा झाली. सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे हे सरकारच्या वतीनं आले होते. त्यांनी सरकारची भूमिका सांगितली.
जर 54 लाख नोंदी जर सापडल्या असतील तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा, ज्यांच्या नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कुणाची आहे हे माहिती करायची असली तर ग्रामपंचायतीमध्ये कागद लावला पाहिजे. तरच एखादा व्यक्ती अर्ज करेल.
ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या परिवारातील सदस्य आणि नातेवाईकांनी त्यासाठी अर्ज करावा, मग त्यांना प्रमाणपत्र मिळेल असं सरकारने आश्वासन दिलं आहे.