नवी दिल्ली : भारत निवडणूक  आयोगाच्या ‘मिशन युवा’ (Mission Yuva Award) या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्याकडून प्रभावीरित्या राबवण्यात आलेल्या  अधिकाधिक नव युवा मतदारांच्या नोंदणीच्या उत्कृष्ट  कामगिरीची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसिस अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.


राजधानी दिल्ली छावणी परिसरातील मानेक शॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 14 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले.


या पुरस्कार वितरण सोहळ्यात, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल उपस्थित होते. देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


निवडणूक आयोगाच्या विविध अभियानांमध्ये, निवडणूक सुधारणा, मतदार शिक्षण, निवडणूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी अधिकाऱ्यांना वर्ष-2023 साठी सात भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) आणि भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


“बेस्ट इलेक्टोल प्रॅक्टिसिस” पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. इटनकर यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, निवडणूक आयोगाद्वारे नागपूर येथे बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसिस मध्ये सुरू असलेला मिशन युवा इन अभियान प्रभावीपणे  राबवण्यात आले असून आठ महिन्यात 88 हजार पेक्षा अधिक नव युवा (17-19 वयोगटातील) युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली.


भारत  निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येणा-या ह्या अभियानातंर्गत नागपूर येथे झालेल्या उल्लेखनीय कार्याचे श्रेय, डॉ. इटणकर यांनी निवडणूक आयोगापासून ते नागपूरचे तहसीलदार, जिल्ह्याचे संपर्क अधिकारी , सहभागी सर्व टीम यांना दिले तसेच सर्वांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की, नागपूर जिल्ह्यामधील त्यांच्या सर्व टीमने मिशन युवा च्या माध्यमातून मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली.


डॉ. इटनकर यांनी सांगितले की,  ‘मिशन युवा’ अभियानांतर्गत 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार युवा मतदारांची नोंदणी करण्यासाठी अभियान जिल्ह्यामध्ये राबवले. या अभियानात जानेवारी 2024 अखेर 17 ते 19 वयोगटातील 88,609 नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.


छत्तीसगड राज्याला निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


आज झालेल्या कार्यकमात राष्ट्रपतीच्या हस्ते “संसदीय चुनाव 2024 लोगो आणि टैगलाइन”चे अनावरण करण्यात आले. तसेच  डाक तिकीटाचे विमोचन, मतदाता शिक्षणावर लघु फिल्मची स्क्रीनिंग, तसेच मतदाता शपथ देणे यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


ही बातमी वाचा: