नागपूर: विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं डॅा. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांना निमंत्रणच नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाला (OBC Reservation) निमंत्रण नसताना कसे जावे, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. त्यामुळे वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या बैठकीत डॉ. तायवाडे जाणार नाहीत. मंडळ आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याची हास्यास्पद भाषा करू नये, असेही ते यावेळी म्हणाले.
तायवाडे म्हणाले, महाराष्ट्रात बिहार सारखीच जातनिहाय गणना व्हावी, यासाठी उद्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात विशेष यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही. ओबीसीचे नुकसान झाले आहे असे म्हणणे मला पटत नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारणार नाही. मंडळ आयोगाच्या विरोधात कोणीही (जरांगे ) न्यायालयात जाऊ शकत नाही. मंडळ आयोगाचा अहवाल देशाच्या संसदेने मान्य केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कोणीही मंडळ आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची हास्यास्पद भाषा करू नये.
महाराष्ट्रात बिहारसारखीच जातनिहाय गणना व्हावी :बबनराव तायवाडे
ओबीसी नेते आणि संघटनांनी एकत्रित बसून विचार विनिमय करण्याची वेळ आली आहे. 25 आणि 26 जानेवारीला शासनाकडून जे निर्णय आणि अधिसूचना जाहीर करण्यात आले, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही सर्वांना काही वेळ देत आहोत, असेही तायवाडे म्हणाले. बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रातही जातनिहाय गणना व्हावी ही आमची मागणी आहे. त्यासाठी उद्यापासून नागपुरात जनजागृती यात्रा काढली जात आहे. पुढे राज्यभर ही यात्रा काढली जाईल. या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवू. सरकारवर दबाव आणू आणि महाराष्ट्रात जातनिहाय गणना करण्यासाठी बाध्य करू. जातनिहाय गणनेच्या माध्यमातून सर्व जातीसमूहाचे अचूक आकडे समोर येतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असे तायवडे म्हणाले.
ओबीसी समाजाची दिशाभूल करणे मला पटत नाही : तायवाडे
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली भुमिका आम्ही आधीच सांगत आहोत की, आमचे कुठेही नुकसान झालेलं नाही. जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी येऊन मला पटवून द्यावे की ओबीसी आरक्षणाला धक्का बसला आहे. तसे पटवून दिले तर एक एक ओबीसी रस्त्यावर आणू राज्यभर आंदोलन उभारू. मात्र ओबीसींचं कुठेही नुकसान झालेलं नसताना उगीच ओबीसी समाजाची दिशाभूल करणे मला पटत नाही, असे तायवाडे म्हणाले.
हे ही वाचा :