Nagpur News: नागपूर : विदर्भात (Vidarbha) खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. येथे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी 2000 कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून देखील 50 हजार कोटींची मत्स्योत्पादन निर्यात शक्य आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या, खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी नितीन गडकारींनी हे भाष्य केले आहे.
मत्स्योत्पादनावर झाले मंथन
खासदार औद्योगिक महोत्सवा अंतर्गत 'अॅडव्हांटेज विदर्भ' (Advantage Vidarbha) या विदर्भातील गुंतवणुकीला गती देणारा महोत्सव सुरू करण्यात आलाय. या महोत्सवाच्या मंचावर विदर्भातील सर्वात मोठे इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह होत आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी असा तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आले आहे. आज या महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाला मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पुल्केश कदम यांनी शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे असल्याचे सांगत, पारंपरिक मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज व्यक्त केली.
तर ऑस टेक इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख यांनी मॉडर्न अॅक्वाकल्चर प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रादरम्यान मत्स्यशेतीवर दीर्घकाळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या ‘इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
तलावांची व्हावी स्वच्छता
पारंपरिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी ज्या तलावांचे वय 40 ते 50 वर्षे जुने आहे, त्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
नागपूर ‘लॉजिस्टीक कॅपिटल’
नागपुरात मिहान सेझसारखी उत्तम औद्योगिक वसाहत असून, चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. वीज, 24 बाय 7 पाणी, सिंदी ड्रायपोर्टसारखे लॉजिस्टीक हब असून देशभरात कुठेही मालवाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात नागपूर हे ‘लॉजिस्टीक कॅपिटल’ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. ‘डेव्हलपमेंट ऑफ लॉजिस्टीक अँड वेअरहाऊसिंग इंडस्ट्री इन विदर्भ रिजन’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
गोंडवाना विद्यापीठात मिळेल मायनिंगसाठी प्रशिक्षण – नितीन गडकरी
गडचिरोली जिल्ह्यातील मायनिंगच्या बाजुला स्टील उद्योग सुरू करता येईल आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षक कार्यक्रम राबवता येतील. स्थानिक युवकांना प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होईल, सोबतच गडचिरोलीमध्ये चांगल्या प्रतीचे आयर्न उपलब्ध असून तेथे एक चांगले स्टील मॅन्युफॅक्चरींग हब तयार होऊ शकतो, असा आशावाद देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
इतर संबंधित बातम्या