Rohit Pawar ED Inqury : नागपूर : विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जातोय, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते (NCP Leader) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. बारामती ॲग्रो कथित घोटाळा प्रकरणी (Baramati Agro Scam Case) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)  यांना  ईडीने (ED) चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. रोहित पवार (Rohit Pawar) यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं देखील रोहित पवार म्हणाले.


काय म्हणाले अनिल देशमुख?


रोहित पवारांच्या ईडी चौकशी प्रकरणी राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. 'जो कुणी चांगलं काम करतो, सरकारच्या विरोधात कुठली भुमिका घेतो, त्यांच्या विरोधात चौकशी नेमली जाते. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्राणांकडून ठरवून त्रास दिला जातोय. मात्र रोहित पवार आमचे युवा नेते आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष रोहित पवारांच्या पाठिशी आहेत', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.


सरकार विरोधात आवाज उचलणाऱ्यावर कारवाई 


अनिल देशमुख यांनी यावेळी सरकार आणि केंद्रीय यंत्रणावर टीकास्त्र डागत म्हटलं की, 'रोहित पवारांनी राज्यात 800 किलोमीटरची चांगली संघर्ष यात्रा काढली. यामध्ये त्यांनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडले. चांगलं काम करणाऱ्यांविरोधात सरकार अशा कारवाया करत आहे. रोहित पवार हे आमचे युवा सहकारी आणि खंबीर नेते आहेत. ते या चौकशीला खंबीरपणे समोर जातील. असाच त्रास मला, संजय राऊत, आणि नवाब मलिकांना दिला जातोय. फक्त विरोधकांना टार्गेट केलं जातंय. मात्र भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई होत नाही.' असे असले तरी आज आम्ही सर्व रोहित पवारांच्या सोबत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले.


'चार वर्षांपूर्वी असाच एक असफल प्रयत्न  शरद पवार साहेबांच्या बाबतीत  झाला होता.  त्यांना देखील ईडीचा नोटीस पाठवली. मात्र तेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले होते. पण जेव्हा शरद पवारांनी स्वतः सांगितलं की मी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देईन आणि त्यांनी जायची तयारी देखील दाखवली. तेव्हा स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त पवार साहेबांना भेटले. त्यामुळे पवार साहेब गेले नाही. देशात दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल येथील सरकारला ईडी कडून त्रास दिला जातोय. फक्त विरोधकांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे', असं देखील अनिल देशमुख म्हणाले.


निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार


ईडीला मोठी ताकद आहे. एकदा अटक झाली तर वर्षभर बेल होत नाही. जर 200 लोकांना ईडीने अटक केली तर त्यातील एकाला शिक्षा होते. कन्विक्शन रेट कमी आहे. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन दिलं, मात्र त्यावर फार काही झालं नाही. निवडणूका जशा जवळ येतील तशा या कारवाया वाढणार आहे. मात्र आम्हाला कितीही त्रास दिला तरी आम्ही खंबीर आहोत. असे देखील अनिल देशमुख म्हणाले. सध्या भाजप पक्षांतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत. बाहेरुन आले आणि पहिल्या पंगतीत बसले.  यामुळे भाजप आमदार नाराज आहे. निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार. त्यांच्यात अस्वस्थता जास्त आहे. त्यामुळे भाजपमधून लोक बाहेर पडणार असल्याचा विश्वास देखील अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला. 


महत्वाच्या इतर बातम्या