Rohit Pawar ED Inqury : मुंबई : बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी (Baramati Agro Scam Case) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)  यांना ईडीनं (ED) चौकशीसाठी समन्स बजावलेलं. रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज म्हणजेच, 24 जानेवारीला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेलं. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झालेत. साधारणतः सकाळी साडेदहा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. 


आमदार रोहित पवार यांची आज मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवार ट्रायडन्ट हॉटेलवरुन निघाल्यापासून ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्वात आधी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) दिवसभर मुंबईतील पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आलेल्या. दरम्यान, ईडी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. तसेच, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. अशातच 19 जानेवारी रोजी ईडीनं रोहित पवारांना समन्स धाडलं आणि 24 जानेवारी म्हणजेच, आज चौकशीसाठी हजर राहण्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार, आज रोहित पवार चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले आहेत. 


रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंतचा घटनाक्रम



  • रोहित पवार मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते

  • सकाळी ट्रायडन्ट हॉटेलवरुन ते निघाले

  • ट्रायडन्ट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती 

  • ट्रायडन्टवरुन रोहित पवार थेट दक्षिण मुंबईतील पक्ष कार्यालयात पोहोचले. 

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे कार्यालयात आधीपासूनच उपस्थित होत्या

  • रोहित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून ते ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना झाले 

  • सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडण्यासाठी त्यांच्यासोबत गेल्या होत्या. 

  • पक्षकार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली 

  • सुप्रिया सुळे रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आले

  • ईडी कार्यालयाबाहेरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली 

  • सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेऊन, रोहित पवार ईडी चौकशीसाठी कार्यालयात निघून गेले


ईडी कार्यालयात घेऊन गेलेल्या फाईलवर महापुरुषांचे फोटो 


रोहित पवार आज ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना स्वतःसोबत एक फाईल घेऊन गेले आहेत. त्या फाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहित पवारांनी आपल्यासोबत ईडी कार्यालयात जी फाईल नेली, त्या फाईलवर सर्व महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो लावले आहेत. त्या फाईलवर 'विचारांचा वारसा' असंही लिहिण्यात आलं आहे. 


बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी आरोप काय? 


कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला. 50 कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केली, असा आरोप आहे. लिलावातील सहभागी बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचं बोललं जातं.