Nagpur News: जागतिक स्तरावर होणाऱ्या वातावरणातील बदलांचा सर्वाधिक परिणाम हा शेतीवर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने जिल्हास्तरावर हवामान सल्ला मिळत असेतो. त्या आधारे पीक व्यवस्थापन करता यावे आणि त्यातून पीक नुकसान कमी व्हावे, या उद्देशातून देशभरात 199 तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. या जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस हवामानाचा अचुक अंदाज, हवामान आधारित कृषी सल्ला शेतकरी बंधूंना प्राप्त होत असे. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात आल्याने केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
1 मार्च पासून होईल सेवा बंद
देशात 2018-19 या वर्षात जिल्हा कृषी हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने देशात एकूण 199 तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. या आधारे शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचे आणि इतर घटकांचे योग्यप्रकारे आणि सुक्ष्मपणे नियोजन करीत होते. याव्यतिरिक्त हवामानात होणारे अचानक बदल जसे की, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, शीत लहर, पावसाचा खंड इत्यादि विषयी जिल्हा कृषी हवामान केंद्र त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध करीत असे. त्यामुळे शेतकरी सजग होऊन आपल्या पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास सक्षम होत असे.
अशा या हवामान आधारित कृषी सल्ला सेवेमुळे देशातील शेतकरी वर्गाला मोठा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या परीपत्राकानुसार देशातील शेतकरी हितार्थ काम करणारी ही 199 जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 1 मार्च 2024 पासून हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होणार नाही.
यात शेतकरी बंधुंचे फार मोठे नुकसान होणार असल्याची भावना उमटतांना दिसत आहे. सरकारचा हा निर्णय देशातील असंख्य शेतकऱ्यांसाठी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेती क्षेत्रासाठी चिंताजनक असून शेवटी याचे नकारात्मक रूपांतर राष्ट्रीय आर्थिक विकास दरात होणार असल्याची भिती आहे. याचा पुनर्विचार करून शेतीला राष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकारने ही जिल्हा कृषी हवामान केंद्र पुर्ववत सुरू ठेवावी ही मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
महाराष्ट्रातील 11 केंद्रांचा समावेश
महाराष्ट्रात पालघर, तुळजापूर (धाराशिव), छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदूरबार, सीआयसीआर (नागपूर), दुर्गापूर (अमरावती), गडचिरोली, साकोली (भंडारा), करडा (वाशीम), बुलडाणा अशा 11 ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली होती. मंगळवार आणि शुक्रवार असा दोन • दिवस हवामान आधारित सल्ला दिला जात.
महत्त्वाच्या बातम्या: