Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) बहुचर्चित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांच्याविरोधात पुन्हा चौकशीचा फेरा सुरू करण्यात आलाय. कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी कुलगुरू डॉ. चौधरींची नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा आपल्या कुलगुरू पदाचा (Vice Chancellor) पदभार स्वीकारल्या नंतर आता पुन्हा डॉ. चौधरींवर संकटाचे ढग गडद असल्याचे बोलले जात आहे. 


राज्यपालांनी दिले नव्याने चौकशीचे आदेश  


विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत त्यांची तक्रार राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे  करण्यात आली होती. परिणामी, या तक्रारींची दखल घेत राज्यपालांनी डॉ. चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर डॉ. चौधरी यांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रद्द केला आणि आणि डॉ. चौधरी यांना आपल्या कुलगुरू पदी कायम राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. चौधरी यांनी दुसऱ्यांदा आपल्या कुलगुरू पदाचा  पदभार स्वीकारला होता.


असे असले तरी राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या कार्यालयाकडे विविध सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या आरोपांबाबत डॉ. चौधरी यांच्याविरुद्ध नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच राज्यपालांनी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे  कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे.   


सलग दुसऱ्यांदा स्वीकारला कार्यभार 


नागपूर विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत शहरातील अनेक लोकप्रतिनिधींसह विद्यापीठातील विविध सदस्यांनी शासन आणि राज्यपालांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना दिला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, शासनाचे ‘एमकेसीएल’ संदर्भात आदेश असताना त्याची अवहेलना करण्यात आल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. परिणामी, या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते.


या कारवाई नंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी नागपूर विद्यापीठाचा पदभार स्वीकारला होता. मात्र, दुसरीकडे डॉ. चौधरी यांनी तात्काळ या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रद्द केला आणि डॉ. चौधरी यांना पुन्हा आपल्या कुलगुरू पदी कायम राहण्याचे आदेश देत मोठा दिलासा दिला होता. मात्र, आता पुन्हा या संबंधित चौकशीचे आदेश देण्यात आल्याने आजून कुठले नवे संकट कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या पुढे उभे ठाकतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या