Nagpur News नागपूर : कार चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित कार गोवरी नदीपात्रात कोसळल्याने (Accident) पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. ही घटना 26 एप्रिलला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावर घडली. रवींद्र भैय्याजी टाले (33), भैय्याजी टाले (65) हे दोघेही राहणार तोंडाखैरी, अशी मृतकांची नावे असून राहुल डोमके (35, रा.तोंडाखैरी, तालुका कळमेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 


बापलेकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी


प्राप्त माहितीनुसार, भैय्याजी टाले हे कळमेश्वर शहरात रथयात्रा निमित्त सुरू असलेला दुय्यम खडा तमाशा बघण्याकरिता आले होते. रात्री उशिरापर्यंत वडील घरी न आल्याने त्यांचा मुलगा रवींद्र टाले हा त्याचा मित्र राहुल डोमके याच्यासह हुंडाई कंपनीची वरणा कारने (कार क्रमांक MH 43 AL9591) कळमेश्वरला आले आणि  वडिल भैय्याजी टाले यांना घेऊन मध्यरात्री बारा वाजता दरम्यान तोंडाखैरी गावाकडे जात होते. दरम्यान गाडी गोवरी नदीपात्राजवळ आली असता हि घटना घडली. या अपघातात रवींद्र टाले आणि त्याचे वडील भैय्याजी टाले हे जागीच मरण पावले आणि मागे बसलेला राहुल डोमके हा गाडीची काच फुटल्याने पात्रालगत असलेल्या झाडावरची फांदी पकडून रात्रभर गंभीर जखमी अवस्थेत लटकलेला होता. सकाळी गावकरी फिरायला निघाले असता त्यांना हा अपघात दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना (Nagpur Police) या घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी पुढील प्रक्रिया राबवत जखमीच्या उपचारासाठी हालचाली सुरू केल्या. 


गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात 


या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने टाले कुटुंबियासह परिसरात शोककळा पसरली आहे. रात्रीच्या वेळी रस्ता सुनसान असल्याने कारचा वेग जास्त असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर यात सुदैवाने राहुल डोमके हा थोडक्यात बाचावला आहे. मात्र, त्याला देखील जबर मार बसला असून त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्या गेलंय. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पुढे आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच अपघातग्रस्त कार नदीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या