नागपूरः शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्याची घोषणा सरकारने केली होती. काही मुलांना पुस्तके मिळाली. पण, अजूनही जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुस्तकांची प्रतीक्षाच आहे. प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आली. पण, विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाही. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. गरिबाच्या लेकरानं अभ्यास करावा तरी कसा?, का त्याईनं शिकूभी नये?, असा जळजळीत प्रश्न ग्रामीण भागातील चिंतीत पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
समग्र शिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषद, मनपा, नगरपरिषदेच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके निःशुल्क उपलब्ध करून दिली जातात. जिपच्या शिक्षण विभागाकडून 2020-21 च्या युडायएस नोंदीनुसार इयत्ता 1 ते 8 वीपर्यंतच्या 1,50, 972 विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांसाठी ऑनलाईन नोंदणी बालभारतीकडे करण्यात आली होती. इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या 85,296 विद्यार्थ्यासाठी तसेच 5 वी ते 8 वीपर्यंतच्या 65 हजार 676 विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळाणार होती. शाळांच्या मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरणही झाले. परंतु, यंदाच्या सत्रात जिप शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली. परिणामी पाठ्यपुस्तके अपुरी पडली. पुन्हा जिल्हा परिषदेने 23 हजारांहून अतिरिक्त पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे. पुस्तके न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी इतरांची पुस्तके घरी नेऊन वेळ भागवून नेली. पण, आता परीक्षा तोंडावर असल्याने कुणीही आपले पुस्तक देणार नाही. ही बाब लक्षात येताच पुस्तकांची आतुरता अधिकच वाढली आहे.
पहिली चाचणी दिली पुस्तकांविनाच
शिक्षण विभागाने सेमी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांकरिता नव्याने 23 हजार 268 पुस्तकांची मागणी एमपीएसपीकडे जून महिन्यातच केली. मागणी मान्य करून पावणे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पुस्तके मिळू शकली नाही. एमपीएसपी बालभारतीकडून पुस्तकांची खरेदी करते. त्यानुसार मागणीनुसार त्या-त्या जिल्ह्यासाठीच्या पुस्तकांसाठी पत्र एमपीएसपीकडून बालभारतीकडे जात असते. नागपूरप्रमाणेच इतरही काही जिल्ह्यात पुस्तकांची अतिरिक्त मागणी होण्याची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातून मागणी आल्यावर सर्वांसाठी एकत्र पुस्तकांची मागणी करायची असे धोरण एमपीएसपीचे असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी पुस्तकांविनाच पहिली चाचणी परीक्षाही दिली. आता प्रथम सत्रांत परीक्षाही पुस्तकांअभावीच द्यावी लागून शकते.
तालुकानिहाय पुस्तकांची अतिरिक्त मागणी
तालुका पुस्तक संख्या
नागपूर ग्रामीण 4053
हिंगणा 2562
उमरेड 2296
भिवापूर 1076
कुही 831
रामटेक 1059
मौदा 1604
पारशिवणी 1553
काटोल 1901
नरखेड 1267
सावनेर 809
कळमेश्वर 1744
कामठी 2513
इतर महत्त्वाच्या बातम्या