नागपूर : कोरोनामुळे अनेक मर्यादा असलेल्या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सव बनवण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. नागपूर पोलिसांनी गणेशोत्सवात रक्तदान शिबिरे आयोजित करत 635 युनिट्स रक्त गोळा केले आहे. या शिवाय कोरोनाच्या उपचारात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्लाज्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्या 50 नागपूरकरांना तयार करून त्यांचे प्लाज्मा आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्याची सोय ही नागपूर पोलिसांनी केली. त्यामुळे 10 दिवस गणपती बाप्पांच्या उत्सवात चोख बंदोबस्त बजावणाऱ्या नागपूर पोलिसांनी बाप्पांच्या चरणात एक आगळी वेगळी सेवा अर्पण केली.


गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना सतत सुरक्षेसाठीच्या बंदोबस्तात तैनात राहावे लागते. त्यामुळे त्यांना कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ पोलिसांना क्वचितच मिळतो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेत नागपूर पोलिसांनी त्यांचे नियमित बंदोबस्त सांभाळत गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सवात रूपांतरित केले आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा गणेशोत्सव राज्यावरील महामारीचे संकट लक्षात घेता आरोग्य उत्सवात रूपांतरित करा, असे आवाहन केले होते. आणि नेमकी तीच भूमिका लक्षात घेत नागपूर पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्त दान करण्याचे ठरवले.


गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बंदोबस्तात सर्व पोलीस व्यस्त असतात म्हणून विसर्जनाच्या आधी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी पोलीस जिमखाना येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 423 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत रक्त दान केले. काही प्रमाणात सामान्य नागपूरकरही ही या शिबिरात सहभागी झाले. आणि पाहता पाहता 635 युनिट्स रक्त संकलित झाले.


पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना नेहमीच विविध रुग्णालयांशी संपर्कात राहणाऱ्या नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना काही दिवसांपूर्वी लक्षात आले की, कोरोना महामारीमुळे संक्रमणाच्या भीतीपायी लोकांनी रक्तदान करणं जवळपास थांबवले आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय आणि ब्लड बॅंक्समध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतोय. लोकांच्या मनातील भीती नाहीशी केल्याशिवाय रक्त दानाची ही चळवळ या महामारीच्या संकटात मजबूत राहणार नाही आणि त्यामुळेच नागपूर पोलिसांनी स्वतःच्या कृतीतून उदाहरण प्रस्तुत करण्याचे ठरविले आणि पोलिसांच्या रक्तदान शिबीराची संकल्पना समोर आली.


विशेष म्हणजे नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे सुमारे 50 कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे आले. त्यामुळे या कोरोनामुक्त नागरिकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजच्या माध्यमातून अनेक कोरोनाबाधितांचे जीव वाचविणे शक्य होणार आहे. भविष्यात कोणाला ही कोरोना मुक्त व्यक्तीचा प्लाज्मा लागल्यास त्यांच्या उपचारात ही नागपूर पोलीस मदत करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात पुराचा कहर, अनेक गावं पाण्यात, रेस्क्यू ऑपरेशन सुरु


अंधश्रद्धेचा कळस.... बार्शीत चक्क कोरोना देवीची प्रतिष्ठापना!


तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे महापालिका आयुक्त आता मुंबईत